जिल्ह्यात साडेअकरा लाख जण झाले लसवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:45+5:302021-04-28T04:43:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सध्याच्या या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा कहर झाला आहे. त्यातून बचाव करण्यासाठी एकमेव आधार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्याच्या या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा कहर झाला आहे. त्यातून बचाव करण्यासाठी एकमेव आधार ठरलेली कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्ह्यातील २५८ लसीकरण केंद्रांवर वयोवृद्धांसह तरुणांनी एकच गर्दी केली आहे. या गर्दीतील मागच्या पुढच्याला आधार देऊन स्वत:ची मनधरणी करून बहुतांशीं जणांकडून ‘घ्या बिनधास्त लस’ असा सूर ऐकायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी शुकशुकाट असलेल्या या केंद्रांवर आता ज्येष्ठांबरोबर तरुणांच्या रांगा दिसत आहेत. त्यात रंगणाऱ्या गप्पांमध्ये लस घेण्याची आस स्वस्थ बसू देत नाही. पण ‘रांगेचा फायदा सर्वांना’ मिळत असल्याने आतापर्यंत ११ लाख ४७ हजार ६६१ जणांनी या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.
आता १ मे नंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनाही ही कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आता १९ वर्षांच्या ६९ हजार २०७ तरुणांसह २९ वर्षांच्या १० लाख़ १६ हजार ८२४ आदी १० लाख ८६ हजार तरुणांच्या लसीकरणाची भर पडली आहे. याशिवाय ३९ वर्षांच्या १५ लाख ९२ हजार ३६ तरुणांसह ५० वर्षांच्या आतील म्हणजे ४९ वर्षांपर्यंतच्या १६ लाख ८५ हजार ३१ जणांच्या लसीकरणाची जबाबदारी आता नव्याने वाढली आहे. या वाढीव जणांच्या लसीकरणास प्रारंभ झाल्यास आपणास लस घेण्यास विलंब होईल आणि नाहक कोरोनास बळी पडण्याची धास्ती लागल्यामुळे लसीकरणाच्या २५८ केंद्रांवर सध्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. लस घेऊन कोरोना मुक्त झाल्याचे समाधान मिळवण्यासाठी या रांगा उन्हातान्हात लागलेल्या आहेत.
-------