ठाण्यात विशेष कक्षासह दीड लाख सर्जिकल मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 01:25 AM2020-03-06T01:25:17+5:302020-03-06T01:25:21+5:30
रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी दीड हजार एन-९५ मास्क व दीड लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था केली आहे.
ठाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन संशयित रुग्णावर तातडीने उपचार करण्याची खबरदारी घेतली आहे. संशयित रुग्णांसाठी कळव्याच्या छत्रपत्री शिवाजी महाराज रुग्णालयात आठ खाटांचा विलगीकरण कक्ष उपलब्ध केला आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी दीड हजार एन-९५ मास्क व दीड लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था केली आहे.
महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी या सर्व गोष्टींचा आपल्या दालनात बैठक घेऊन आढावा घेतला. प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशी चर्चा करून महापौर दालन येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश सोनालीकर व अधिष्ठाता शैलेश्वर नटराजन यांच्यासमवेत महापौरांनी ही बैठक घेतली. महापालिकेने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे सांगून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
परदेशांतून भारतात नागरिक येत असतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दररोज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शासनाचा आरोग्य विभाग आलेल्या प्रवाशांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यासोबत १४ दिवस संपर्क साधत असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले.
>वृत्तपत्रांतून आवश्यक
जागृती करावी
कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व याबाबत घ्यावयाची खबरदारी यासंदर्भातील माहिती देणारी भित्तीपत्रके लावून वर्तमानपत्रांतूनदेखील याबाबत आवश्यक माहिती प्रसिद्ध करावी तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या. तसेच महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन केले.
>महापालिका डॉक्टरांना
तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
सद्य:स्थितीत उपलब्ध असलेला औषधसाठा रु ग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे. याबाबत महापालिकेने पूर्ण खबरदारी घेतली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच या आजारासंदर्भात रुग्णांवर करण्यात येणारे उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टरांना मार्गदर्शन केले असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.
>ठाण्यात मास्कच उपलब्ध नाही
कोरोनाबाबत लोकांमध्ये दहशत असताना ठाण्यातील औषधी दुकानांमध्ये मास्कच उपलब्ध नसल्याची माहिती उघड झाली आहे. मुळात मास्कचा पुरवठा करणाºया कंपनीकडेच मास्क नसल्याचे समजते. हा तुटवडा नैसर्गिक आहे की, मागणी वाढण्याची शक्यता हेरुन काळाबाजार करण्याची पूर्वतयारी आहे, हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे.