संसार उघड्यावर : बदलापूरमध्ये पुरात दीड हजार घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:48 AM2019-08-01T00:48:11+5:302019-08-01T00:48:28+5:30

संसार उघड्यावर : वैद्यकीय यंत्रणा अजूनही अपुरी, पंचनाम्याला सुरूवात

One and a half thousand houses damaged in Badlapur | संसार उघड्यावर : बदलापूरमध्ये पुरात दीड हजार घरांचे नुकसान

संसार उघड्यावर : बदलापूरमध्ये पुरात दीड हजार घरांचे नुकसान

Next

बदलापूर : शहरात २६ जुलैच्या रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात आठ ते दहा हजार घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले. सरकारी मदत पोहचवण्यासाठी पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली आहे. सुमारे दीड हजार घरांचे आणि ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज देशमुख यांनी व्यक्त केला आहे. शहरात रोगराई पसरू नये यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगितले. पालिकेच्या पथकाबरोबरच विशेष पथक शहरात वैद्यकीय शिबिर घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी, हेंद्रेपाडा, गणेशनगर, दुबे बाग, भारत कॉलेज परिसर, दीपाली पार्क, शिवनगर, सर्वोदयनगर आदी भागातील सुमारे आठ ते दहा हजार घरांमध्ये पाणी शिरले होते, तर शहरातील सुमारे अडीच हजार दुकानांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी घरात प्रवेश केला. मात्र पुराच्या पाण्यामुळे घरातील सर्व वस्तू पाण्या खाली आल्याने त्या वापरण्याजोग्या राहिल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घरातील भिजलेले धान्य, गाद्या, कपडे बाहेर टाकले आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून कचरा वेळीच उचलला जात आहे. घरातील महत्त्वाची कागदपत्रेही भिजली आहेत. या पुरामध्ये अंबरनाथ तालुक्यात ५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सध्या तहसील विभागामार्फत पूरग्रस्त घरांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले. सरकारी नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देणार आहे. कचरा उचलण्याचे कामही सुरू असल्याचे नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव यांनी सांगितले. आरोग्य शिबिरे घेण्यात येत असून कर्मचाऱ्यांची कमतरता नसल्याचे डॉ अंकुश यांनी सांगितले. अतिरिक्त डॉक्टरांची व औषधांची मागणी सरकारकडे केली असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: One and a half thousand houses damaged in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.