वॉर्डबॉयच्या ८० जागांसाठी मुलाखतीला दीड हजार तरुण; केडीएमसीची भरती प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:07 AM2020-07-02T05:07:30+5:302020-07-02T05:07:41+5:30
गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कल्याण : कोविडशी सामना करण्यासाठी केडीएमसीने चौथ्या टप्प्यांत वॉर्डबॉयच्या ८० जागांसाठी आॅनलाइनद्वारे जाहिरात दिली आहे. त्यामुळे बुधवारी राज्यातील विविध भागांतून जवळपास दीड हजारपेक्षा जास्त तरुण-तरुणींनी मुलाखतीसाठी मनपा मुख्यलयात गर्दी केली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
कोविडशी सामना करण्यासाठी मनपाने यापूर्वी डॉक्टर, नर्स पदासाठी भरती प्रक्रिया राबविली होती. भरतीच्या चौथ्या टप्प्यांत वॉर्डबॉयच्या ८० जागांसाठी आॅनलाइनद्वारे जाहिरात दिली होती. ही भरती कोविडच्या काळापुरती मर्यादित आहे. वॉर्डबॉयसाठी दहावीपर्यंत शिक्षणाची अट असून, प्रत्येकास प्रति महिना १८ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. कोरोना काळात केवळ वैद्यकीय क्षेत्रात नोकर भरती केली जात आहे. वॉर्डबॉयच्या ८० जागांसाठी राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून उमेदवार बुधवारी मनपा मुख्यालयात आले होते. सुभाष मैदानात आधी त्यांची कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. उमेदवारांना रांगेने सोडण्यात येत असले तरी सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते.
धुळे येथून दुचाकीने ४०० किलोमीटरचा प्रवास करून कल्याण गाठणाºया प्रवीण बागूल याने सांगितले की, ‘लॉकडाऊनमुळे ट्रेन, बसची सुविधा नाही. हाताला काम नाही. आॅनलाइनवर वॉर्डबॉयसाठी जाहिरात वाचली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता धुळ्याहून निघालो. रस्त्यात पाऊस होता. पहाटे ३ वाजता कल्याणमध्ये पोहोचलो. इतका लांबचा प्रवास करून आल्यावर येथे ८० जागांसाठी इच्छुकांची इतकी मोठी गर्दी पाहून आमची निवड होईल का, याबाबत मी साशंक आहे.’
नगरहून आले मुलाखतीला
अहमदनगर, पाथर्डी येथील जिरेवाडीचे गणेश आंधळे व सहकाऱ्यांनी कल्याणमध्ये मुलाखतीला येण्यासाठी चारचाकी गाडी भाड्याने घेतली. गाडीच्या इंधनासाठी त्यांना १२०० रुपये खर्च करावे लागले. आंधळे यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.