दिवाळीतील रेव पार्टीसाठी इफेड्रिनची तस्करी एकाला अटक : एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 06:53 PM2018-10-24T18:53:39+5:302018-10-24T19:01:23+5:30
चेन्नईतून ठाण्यामध्ये रेव पार्टीच्या एजंटामार्फत इफेड्रीनची तस्करी करण्यासाठी आलेल्या अवील मोंथेरो याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटींचे इफेड्रीन हस्तगत केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिवाळीमध्ये रेव पार्टींसाठी इफेड्रिनच्या तस्करीसाठी मुंब्य्रात आलेल्या अवील प्रकाश रॉबर्ट मोंथेरो (३९, रा. खारघर, नवी मुंबई) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून एक कोटींचे चार किलो इफेड्रिन हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुंब्य्रातील कौसा भागात अवील हा इफेड्रीनच्या तस्करीसाठी येणार असल्याची ‘टीप’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याआधारे शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे, उपनिरीक्षक विकास बाबर, रोशन देवरे आणि पोलीस हवालदार नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने कौसा भागात सापळा रचून अवील याला २३ आॅक्टोंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून २५ लाख रुपये किलोने विक्रीसाठी आणलेले चार किलो इफेड्रिनही हस्तगत केले आहेत. दिवाळीमध्ये रेव पार्टीची मौजमज्जा करणाऱ्या तरुण मुलामुलींसाठी चेन्नईतून मुंब्य्रात ते आणल्याचे अवीलने चौकशीमध्ये सांगितले. नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोनेही (एनसीबी) २०११ मध्ये त्याला मॅन्ट्रेक्स टॅबलेटच्या तस्करीमध्ये मुंबईतील सहार या आंतरराष्टÑीय विमानतळावरून अटक केली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वर्षांपूर्वी सोलापुरातील एमआयडीसी भागातील कंपनीतून इफेड्रिनचा मोठा साठा हस्तगत केला होता. त्या कंपनीशी अवीलचे काही संबंध आहेत का? तसेच रेव पार्टीच्या कोणत्या एजंटला तो ते विकणार होता? त्याचे आणखी कोण कोण साथीदार आहेत? या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अवील याला ३० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.