भाईंदरमध्ये रिक्षा चोरी करणाऱ्या सराईतला अटक; ८ गुन्हे उघडकीस येऊन ७ रिक्षा जप्त 

By धीरज परब | Published: March 23, 2024 02:08 PM2024-03-23T14:08:53+5:302024-03-23T14:10:17+5:30

चालू २०२४ सालात नवघर पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते .

one arrested for stealing rickshaws in bhayander 8 crimes were uncovered and 7 rickshaws seized | भाईंदरमध्ये रिक्षा चोरी करणाऱ्या सराईतला अटक; ८ गुन्हे उघडकीस येऊन ७ रिक्षा जप्त 

भाईंदरमध्ये रिक्षा चोरी करणाऱ्या सराईतला अटक; ८ गुन्हे उघडकीस येऊन ७ रिक्षा जप्त 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या रिक्षा चोरास पोलिसांनी कर्नाटक मधून अटक करत रिक्षा चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत . चोरटा हा स्वतः रिक्षा चालक असून नशेसाठी रिक्षा चोरून भाडी मारायचा व गॅस संपला कि तिकडेच सोडून द्यायचा . त्याच्या कडून चोरीच्या ७ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत . 

चालू २०२४ सालात नवघर पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते . रिक्षा चोरीच्या वाढत्या गुन्ह्यां बाबत मीरा भाईंदर परिमंडळ १ चे उपायुक्त प्रकाश गायकवाड , सहायक आयुक्त राजेंद्र मोकाशी यांनी नवघर पोलिसांना गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते . 

रिक्षा चालक अभिमन्यु कनोजीया ( ४२) यांची रिक्षा नवघर - फाटक मार्गावरील शिर्डी नगरच्या आशीष बार समोरून चोरीला गेल्याचे १९ मार्चच्या सकाळी आढळून आले होते . सदर रिक्षा चोरीच्या गुन्ह्या सह अन्य गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी , गुन्हे शाखा निरीक्षक अशोक कांबळे , सहायक पोलीस निरीक्षक संदीप पालवे , उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे सह गौतम तोत्रे , भूषण पाटील , संतोष पाटील , सुरेश चव्हाण , नवनाथ घुगे , ओमकार यादव, सुरजसिंग घुनावत , अस्वर , पवार , कुणाल हिवाळे यांच्या पथकाने चालवला होता . 

रिक्षा चोरीच्या गुन्हयांचा तपास करताना घटनास्थळ व परिसरात सापडलेले सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी पोलिसांनी चालवली होती .  रिक्षा चोर हा सातत्याने पोलीस ठाणे हद्द परिसरात येऊन  रिक्षा चोरीचे गुन्हे करत असल्याचे आढळून आले . त्याची ओळख पटल्यावर पोलीस पथकाने बोरिवलीच्या आय.सी कॉलनी परिसरात शोध घेतला असता रिक्षा चोरणारा हा स्वतःच रिक्षा चालक असून त्याचे नाव शशीकांत मल्लेश कामनोर (३२ ) रा . लींक रोड फुटपाथवर मंडपेश्वर मेट्रो स्टेशनच्या बाजुला, बोरीवली असे असल्याचे निष्पन्न झाले . 

तपासात कामनोर हा मूळचा कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गंजीखेड येथील असल्याचे पोलिसांना समजले . पोलिसांनी त्याच्या मूळगावी जाऊन तपास करत त्याला अटक केली . त्याने चालू वर्षात एकट्या नवघर पोलीस ठाण्यात ६ रिक्षा चोरीचे गुन्हे तर बोरिवलीच्या एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाणे हद्दीत २ गुन्हे असे एकूण ८ गुन्हे केले होते . त्याच्या चौकशीत ७ लाख ६९ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या  ७ रिक्षा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे .  

रिक्षा चालक आरोपी याचे शहरात कुठे राहते घर नसून तो सार्वजनिक ठिकाणी वा रिक्षातच झोपायचा . त्याला गांजा आदी नशेचे व्यसन होते . नशेचा खर्च भागवण्यासाठी तो रिक्षा चोरायचा . रिक्षा चोरण्यासाठी त्याच्या कड़े चाव्या होत्या . त्या चाव्या जुन्या रिक्षांना सहज लागून रिक्षा चालू करायचा . भाईंदर मधून रिक्षा चोरल्या नंतर तो दहिसर पासून अंधेरी पर्यंत मिळेल तशी भाडी घ्यायचा . रिक्षातील गॅस संपला कि रिक्षा त्या ठिकाणी सोडून द्यायचा अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: one arrested for stealing rickshaws in bhayander 8 crimes were uncovered and 7 rickshaws seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.