अवैद्य गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक; सहा लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 07:35 PM2020-12-05T19:35:46+5:302020-12-05T19:36:19+5:30
सुनीलकुमार गुप्ता (31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
ठाणे : ठाण्यातील डोंगरी पाडा येथे एका खोलीत अवैधरित्या गुटख्याचा साथ करून त्याची विक्री करणाऱ्या एका इसमास अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. यावेळी त्याच्याकडून 20 विविध प्रकारचा सहा लाख 89 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राम मुंडे यांनी दिली.
सुनीलकुमार गुप्ता (31) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा व तत्सम पदार्थाचे सेवन, विक्री व वाहतुकीवर बंदी घातली आहे. असे असताना, देखील तंबाखूजन्य पदार्थांसह गुटख्याची विक्री छुप्या पद्धतीने सुरु आहे. त्यात ठाण्यातील घोडबंदर रोड येथील डोंगरी पाडा येथील किंगकाँग नगर येथे एका इसमाने एका खोलीत अवैधरित्या गुटखाचा साथ करून विक्री करत असल्याची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासनाला मिळाली.
या मिळालेल्या माहितीच्याआधारे शनिवारी दुपारच्या सुमारास ठाणे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी किंगकाँग नगर येथे छापा टाकून अवैद्यरित्या गुटखा विक्री करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून 20 विविध प्रकारचा सहा लाख 89 हजार 526 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सुनीलकुमार याला अटक करण्यात आली. तसेच सुनील हा पानटपरी चालकांना गुटख्याची विक्री करत असल्याचे चौकशीत समोर आले असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राम मुंडे यांनी दिली.