दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या टोळीतील एकास अटक: २७ लाखांचे दागिने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 06:47 PM2021-03-12T18:47:46+5:302021-03-12T18:49:14+5:30

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचे दागिने लुबाडणाºया टोळीतील रफीकुल शेख (४८, रा. धारावी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी शुक्रवारी दिली.

One arrested for stealing jewelery under the pretext of polishing jewelery: Rs 27 lakh jewelery seized | दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या टोळीतील एकास अटक: २७ लाखांचे दागिने हस्तगत

नौपाडा पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाईमुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचे दागिने लुबाडणाºया टोळीतील रफीकुल शेख (४८, रा. धारावी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून २७ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून यातील मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत आहे.
नौपाडयातील रहिवाशी अमोद चाचड यांनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी ३२ लाख ८० हजारांचे ७६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी कारागिर राजा शेख याच्याकडे दिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो याच परिसरातील नागरिकांचे सोन्याचे दागिने पॉलिश करुन देत असल्यामुळे त्याच्यावर या भागातील रहिवाशांचा विश्वास होता. यावेळी मात्र त्याने दागिन्यांना पॉलिश करण्याऐवजी त्यांचा अपहार करुन तो पसार झाला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी चाचड यांनी ४०६ प्रमाणे तक्रार दाखल केली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सखोल तपासाचे आदेश दिले होते. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने शेख याने धारावीमध्ये रफीकुल याला केलेल्या एका कॉलच्या आधारावर तसेच एका खबºयाने दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याची चौकशी केली. सुरुवातीला आपल्याला यातले काहीच माहिती नाही, असे सांगणाºया रफिकुल याने नंतर मात्र हे दागिने राजाने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी रफिकुल याला त्याच्या धारावीतील घरातून नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून या अपहारातील २७ लाख ५५ हजारांचे ६४४.४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील मुख्य सूत्रधार राजा शेख आणि त्याच्याकडील उर्वरित पाच लाखांच्या दागिन्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.
रफिकुल याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. शुक्रवारी या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Web Title: One arrested for stealing jewelery under the pretext of polishing jewelery: Rs 27 lakh jewelery seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.