उल्हासनगरात ९० एमडी पावडरसह एकाला अटक; एमडी पावडरची किंमत ६ लाख ३४ हजार
By सदानंद नाईक | Published: September 23, 2023 08:29 PM2023-09-23T20:29:58+5:302023-09-23T20:30:49+5:30
शहर गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहेत.
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-१, शहाड गावठाण येथील आयडीआय कंपनीच्या गेटसमोर १४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पवन सुशील झा याला शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ४० ग्राम एमडी पावडरसह अटक केली होती. पोलीस कस्टडीतील चौकशीत त्याच्याकडे पुन्हा ५० ग्राम एमडी पावडर मिळून आली असून शहर गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड स्टेशन आयडीआय कंपनीच्या गेटनसमोर १४ सप्टेंबर रोजी रात्री एक जण एमडी पावडर विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाने आयडीआय कंपनी गेट परिसरात सापळा रचून संशयितरीत्या फिरणाऱ्या पवन सुशील झा-१९ या तरुणाला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे ४० ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी दिली. पोलीस कस्टडी दरम्यान चौकशीत पवन झा याने आयडीआय कंपनी परिसरात लपून ठेवलेल्या ५० ग्राम एमडी पावडरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांना दिली. त्यांनी ५० ग्राम एमडी पावडर हस्तगत केली. आतापर्यंत एकून ९० ग्राम एमडी पावडर जप्त हस्तगत करून त्याची किंमत ६ लाख ३४ हजार आहे.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे अधिक तपास करीत असून यामागे मोठया माश्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. अटक आरोपी पवन झा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याकडे एमडी पावडर कशी आली. याचा शोध पोलीस करीत आहेत.