खाडी, तलावातील मृतदेहांचा शोध एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:46 AM2017-08-11T05:46:25+5:302017-08-11T05:46:25+5:30
शहरातील खाडी तसेच तलावांमध्ये एखाद्या बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पालिका आता तंत्रज्ञानाचा वापर करणार असून केवळ एका क्लिकवर त्यांना ही माहिती अल्पावधीत उपलब्ध होणार आहे.
ठाणे : शहरातील खाडी तसेच तलावांमध्ये एखाद्या बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पालिका आता तंत्रज्ञानाचा वापर करणार असून केवळ एका क्लिकवर त्यांना ही माहिती अल्पावधीत उपलब्ध होणार आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी गुरुवारी ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात इमेजिंग सोनार प्रणालीचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलास देण्यात आले. या प्रणालीमुळे पाण्याच्या तळाशी असलेला मृतदेह आणि वस्तूंचा तत्काळ शोध घेणे शक्य होणार आहे.
काही वर्षांपासून खाडी तसेच तलावांमध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यात अनेकदा दोन ते तीन दिवस मृतदेहाचा शोध लागत नाही. त्यावर उपाय म्हणून ही प्रणाली आणण्यात आली आहे. परदेशात आणि नौदलामध्ये या प्रणालीचा वापर केला जातो. क्ष-किरण यंत्रणेप्रमाणेच हे यंत्र काम करते. त्यामुळे बोटीमध्ये बसून संगणकाच्या मदतीने पाण्यातील मृतदेह किंवा वस्तूंचा शोध घेता येतो.