आजारपणाला कंटाळून डोंबिवलीतील एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:48 AM2021-02-17T04:48:27+5:302021-02-17T04:48:27+5:30
कसारा : आजारपणाला कंटाळून डोंबिवलीमधील एकाने कसाराजवळील उंबरमाळी रेल्वेस्थानकाजवळ अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. डोंबिवली येथील ...
कसारा : आजारपणाला कंटाळून डोंबिवलीमधील एकाने कसाराजवळील उंबरमाळी रेल्वेस्थानकाजवळ अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. डोंबिवली येथील विष्णूनगर येथील मूलचंद देवजी गौसर (५२)असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गौसर सोमवारी रात्री डोंबिवलीहून ९ पासून बेपत्ता होते. मंगळवारी सकाळी उंबरमाळी रेल्वेस्थानकापासून ५०० मीटर अंतरावर एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत स्थानिकांना दिसला. नागरिकांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाबाबत उंबरमाळी येथील पोलीस पाटील यांना माहिती दिली. या प्रकरणाची माहिती तत्काळ कसारा पोलिसांना दिल्यानंतर कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, प्रताप भोस व बीट अंमलदार रामदास राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची पाहणी केली. जळालेल्या मृतदेहापासून काही अंतरावर आधारकार्ड, मोबाइल, पॅनकार्ड सापडले. त्यावरून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा घरचा तपास लागला. आधारकार्ड व मोबाइलवरून मृताच्या नातेवाइकांना संपर्क करून घटनास्थळी बोलावल्यानंतर हा मृतदेह मूलचंद यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
मूलचंद हे आजारी होते. घरी पत्नी व मुलेही आजारी असतात. सततच्या आजारपणामुळे कामधंदा मिळत नव्हता. अखेर नैराश्यातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा अंदाज मूलचंद यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास कसारा पोलीस करीत असून सध्या आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत कसारा येथील कॉलेज रोडवर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीला अपघात होऊन २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अंकुश मुकणे असे मृत तरुणाचे नाव आहे. कसारा गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या आपल्या घरी दुचाकीवरून जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास त्याचा डॉ. शेटे कॉलेजजवळ एका रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला. हा रहदारीचा मार्ग नसल्याने मध्यरात्रीच्या वेळी अपघात झालेल्या तरुणाची माहिती पहाटे सहाच्या सुमारास फिरायला येणाऱ्यांनी पोलिसांना दिली. घरापासून हाकेच्या अंतरावर या तरुणाचा अपघात झाला. या प्रकरणी कसारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.