कसाऱ्यात गुंडागर्दी करणाऱ्या दोघांपैकी एकाला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:25 AM2018-10-24T11:25:26+5:302018-10-24T11:25:43+5:30
दुसऱ्याची बालसुधारगृहात रवानगी; लोहमार्ग पोलिसांची माहिती
डोंबिवली: नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसमवेत हुज्जत घालणाऱ्या आणि रेल्वे पोलिस दलाच्या जवानावर दगडफेक करत हल्ला करणाऱ्या दोघांना कल्याण रेल्वे न्यायालयात मंगळवारी हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची भिवंडी येथील बालसुधारगृहात, तर दुसरा हल्लेखोर सागर जाधव यास पंधरा दिवसांची जेल कोठडी सुनावल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली.
कसारा स्थानकात हल्ला करण्यात आल्यानंतर दोन हल्लेखोर पळाले होते. त्यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले, अल्पवयीन आरोपी हा आंबिवली तर सागर जाधव हा खर्डी परिसरात राहणारा असल्याचे सांगण्यात आले. ते दोघेही नंदीग्राम गाडीतून कसाऱ्यापर्यंत प्रवास करत असतांना त्यांनी गाडीची चेन पुलींग करणे, प्रवाशांशी भांडण केले होते. त्यांना हटकणा-या जवानावर त्यांनी हल्ला केला होता. त्यानूसार आरपीएफ जवान रामनिवास सिंग कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार सह पोलिस निरिक्षक हरिदास डोळे यांनी त्या दोघांना सोमवारी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना मंगळवारी त्यांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले होते, तेथे न्यायालाने त्या दोघा आरोपिंना शिक्षा सुनावल्याचे पिंगळे यांनी सांगितले.