डोंबिवलीतील नगरसेवकाला ठार मारण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकानेच दिली ५० लाखांची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 07:44 PM2017-12-19T19:44:14+5:302017-12-19T21:46:17+5:30
डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी पडकण्यात आलेल्या एका आरोपीने केला आहे.
ठाणे : डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी भाजपाच्याच एका जेष्ठ नगरसेवकाने ५० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या चौकशीतून उघड झाला आहे. या दरोडेखोरांकडून तीन दरोडे उघड झाले असून त्यांच्याकडून तीन लाख ४० हजारांच्या रोकडसह एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्टल, दोन गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे आणि दोन मोटारसायकलीही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक आहेत. दरम्यान, त्यांना ठार मारण्यासाठी डोंबिवलीमधीलच नगरसेवकाने सुपारी दिली असून त्यातील १० लाख रुपये देखिल आगाऊ म्हणून घेतल्याचेही या दरोडेखोराने दिलेल्या कबूली जबाबात म्हटले आहे. ज्यावेळी कुणाल यांना मारण्यासाठी हे टोळके बाहेर पडले होते, त्यावेळी ते घराबाहेर न पडल्यामुळे या टोळीच्या हल्ल्यातून बचावल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या पुरस्कृत नगरसेवकाला भाजपच्याच जेष्ठ नगरसेवकाने ठार मारण्याची सुपारी दिल्याचे वृत्त पोलीस चौकशीतून बाहेर आल्यानंतर कल्याण डोंबिवली वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दरोडयाची चौकशी सुरु असतांना आता यासंदर्भातील नव्याने गुन्हा दाखल होणार असून त्याची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार असल्याचेही ठाणे ग्रामीणच्या एका बडया अधिका-याने ‘लोकमत’ ला सांगितले.
- ठाणे ग्रामीण भागातील भिवंडीच्या कुडूस येथील एका दरोडयाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने १६ डिसेंबर रोजी सीसीटीव्ही तसेच खबºयांच्या आधारे भिवंडीतून कैलास घोडविंदे याला अटक केली. याच्याच माहितीच्या आधारे राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, विजय मेनबन्सी अशा सहा जणांना अटक केली.
त्यांच्यापैकी विजय मेनबन्सी यानेच दिलेल्या माहितीतून कुणाल पाटील यांना ठार मारण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.