ठाण्यात सदनिका बुकींगच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:14 AM2022-01-24T00:14:16+5:302022-01-24T00:17:20+5:30
सदनिका बुकींगच्या नावाखाली कोपरीतील संजय पाटील (५३) यांच्याकडून एक कोटी ५० हजारांची रक्कम घेणाऱ्या चैतन्य पारेख यांच्यासह दोन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध फसवणूक तसेच मोफा कायद्यान्वये कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सदनिका बुकींगच्या नावाखाली कोपरीतील संजय पाटील (५३) यांच्याकडून एक कोटी ५० हजारांची रक्कम घेणाऱ्या चैतन्य पारेख यांच्यासह दोन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध फसवणूक तसेच मोफा कायद्यान्वये कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोपरीतील टेलिफोन एक्सचेंज कार्यालयाच्या बाजूला पारेख यांचे बांधकाम व्यावसायाचे कार्यालय आहे. २०१५ मध्ये पारेख तसेच जयंत थोरात यांनी कोपरीतील रहिवाशी संजय पाटील आणि त्यांची पत्नी रजनी पाटील यांच्याकडून सदनिका बुकींगच्या अनुषंगाने धनादेश आणि रोख स्वरुपात एक कोटी ५० हजारांची रक्कम स्वीकारली होती. त्यापोटी त्यांना मुंबईतील मुलूंड पूर्व भागातील हरीओम नगर येथील आदित्य पार्क सी मध्ये बुक केलेला फ्लॅट देण्याचे ठरले होते. त्यानंतर सहा वर्षे उलटूनही पारेख आणि थोरात यांनी घेतलेली एक रकमी एक कोटी ५० हजारांची रक्कम परत केली नाही. शिवाय, तिच्या व्याजावरील रकमेचीही फसवणूक केली. त्यांनी बुक केलेला एक हजार २८० चौरस फुटांचा फ्लॅटही पाटील दाम्पत्याला दिला नाही. याबाबत पाटील यांनी पारेख यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. तेंव्हा प्रत्येक वेळी पारेख आणि त्यांचे भागिदार थोरात हे त्यांना वेगवेगळी उत्तरे देत होते. सहा वर्षे उलटूनही बिल्डरकडून प्रतिसाद न मिळाल्याने पाटील यांनी कोपरी पोलीस ठाण्यात आधी तक्रार अर्ज िदला. या अर्जाच्या चौकशीदरम्यानही पारेख यांनी सदनिका बुकींगची रक्कम परत केलीच नाही. अखेर पाटील यांनी याप्रकरणी २२ जानेवारी २०२२ रोजी फसवणूकीसह मोफा अधिनियम २०१६ चे कलम ३,४ आणि पाच प्रमाणे ुगुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी सांगितले.