एपीएमसीचे एक कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:08 AM2019-08-06T00:08:42+5:302019-08-06T00:09:43+5:30
फुल मार्केटचे गाळे पाण्याखालीच; १४०० व्यापाऱ्यांना पुराच्या पाण्याचा फटका
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक हजार ४०० व्यापाऱ्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. रविवार आणि सोमवारी बाजारातील कामकाज ठप्प झाल्याने जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. फुल मार्केटचे सर्व गाळे दुसºया दिवशी सोमवारी दुपारपर्यंत पाण्याखालीच होते. त्यामुळे फुल विक्रेत्यांनी बाजार समितीच्या आवाराबाहेर टेम्पोत दुकान थाटून विक्री केली.
बाजार समितीच्या बाजूने मोठा नाला वाहतो. अतिवृष्टी झाल्यास तेथून फुल मार्केटमध्ये पाणी शिरते. मात्र, रविवारी बाजार समितीत पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले. त्यामुळे फुलविक्रेत्यांनी बाहेरचा रस्ता धरला. फुल मार्केटमध्ये दररोज १० ते १५ लाख रुपयांची उलाढाल होते. परंतु, रविवारी पावसामुळे बाजार समितीचा कारभार ठप्प होता. फुल मार्केटमधील पाणी दुपारी १२ वाजले तरी ओसरले नव्हते. फुल बाजार हा पहाटे ४ वाजल्यापासून सुरू होतो. पाण्यामुळे फुलविक्रेत्यांनी बाजार समितीच्या आवाराबाहेर रस्त्यावरच टेम्पो, ट्रकमध्ये फुलविक्री केली.
२६ जुलै २०१९ रोजी झालेल्या पुराचा फटकाही फुल मार्केटला बसला होता. यावेळी अन्नधान्य, कांदाबटाटे व भाजीपाला दुकानांच्या गाळ्यांनाही मोठा फटका बसला आहे. कांदाबटाटा बाजार आणि भाजीपाला मार्केटमध्ये दररोज प्रत्येकी पाच लाखांची, तर अन्नधान्य बाजारात दररोज ३० लाखांची उलाढाल होते. तर, सर्व बाजारातून दिवसाला किमान ५० लाख रुपयांची उलाढाल होते. परंतु, रविवार व सोमवारी बाजार समितीचे कामकाज ठप्प झाले. त्यामुळे दोन दिवसांत एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी दिली.
केडीएमसीमुळे रखडला विकास : महापालिकेने बांधलेले फुल मार्केटचे गाळे मोडकळीस आल्याने या मार्केटच्या विकासासाठी बाजार समितीने महापालिकेच्या नगररचना विभागातून मान्यता मिळवली. बांधकाम आराखड्याला महासभा व तत्कालीन आयुक्तांनी मान्यता दिली. त्यामुळे नवीन इमारतीसाठी निविदा मागवण्यात आली. बांधकाम सुरू होण्याच्या बेतात असताना महापालिका आयुक्तांनी त्याला स्थगिती दिली आहे. परिणामी, फुल मार्केटचा विकास रखडला आहे. दरवर्षी पावसात फुल मार्केटमध्ये पाणी शिरत असल्याने आयुक्तांनी स्थगिती उठवावी. स्थगिती कोणत्या कारणासाठी दिली आहे. त्याचा स्पष्ट उल्लेख व कारण स्पष्ट केले नसल्याचे थळे यांनी सांगितले.