एकाच दिवसात वाहतूक शाखेने केली १९४१ वाहनांवर कारवाई; सुमारे १० लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 12:33 AM2020-06-30T00:33:10+5:302020-06-30T00:33:22+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरी राहणे गरजेचे आहे. तरीही, अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करीत नाहीत
ठाणे : नियमांचे उल्लंघन करीत वाहतूक करणाऱ्या तब्बल एक हजार ५५३ दुचाकीस्वारांसह एक हजार ९४१ वाहन चालकांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रविवारी कारवाई केली. या चालकांकडून नऊ लाख ७० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागातील १८ युनिटच्या पथकांनी २८ जून रोजी एकाच दिवसात ही कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच नागरिकांनीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही दुचाकीवरुन डबल सीट, रिक्षा तसेच मोटारकार आणि कॅबमध्येही दोनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती उपायुक्त काळे यांना मिळाली होती.
या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कळवा युनिटने सर्वाधिक १८६ दुचाकींवर, अंबरनाथ युनिटने सर्वाधिक २७ रिक्षांवर तर कोनगाव युनिटने सर्वाधिक ३५ मोटारकारमधून जादा प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली. संपूर्ण आयुक्तालयात अशा एक हजार ५५३ दुचाकी, १६६ रिक्षा तर २२२ मोटारकारवर कारवाई करण्यात आली. प्रत्येक वाहन चालकांकडून पाचशे रुपये दंड वसूल केला असून काहींचा ई-चलनाद्वारे दंड आकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कल्याण-डोंबिवलीत ३२८ वाहनचालकांना दंड
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घातलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी रविवारी कल्याण-डोंबिवलीतील दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी, अशा ३२८ वाहनांवर कारवाई केली. तसेच संबंधित चालकांना ई-चलनद्वारे दंड ठोठावला आहे.कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवासासाठी परवानगी होती. परंतु, सध्या इतर वाहनांना परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार, दुचाकीवर केवळ चालकच असेल, तर रिक्षा आणि मोटारीमध्ये चालकासह दोघांना प्रवासास परवानगी आहे. मात्र या नियमांचे सर्रासपणे वाहनचालकांकडून उल्लंघन होत असल्याने वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाईला सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान काही वाहने जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरी राहणे गरजेचे आहे. तरीही, अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करीत नाहीत. त्यामुळेच कडक नाकाबंदी केली आहे. अनावश्यक आणि जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार आहेत. - अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर