ठाण्यातील उपवन येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यु: चालक तरुणी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:22 PM2021-01-27T23:22:06+5:302021-01-27T23:28:48+5:30
उपवनकडून पवारनगरकडे जाणाऱ्या मोटारकारने रस्त्यावरील एका झाडाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये सुमित ढाकणकर (३३, रा. वसंतविहार, ठाणे) या कारमधील सहप्रवाशाचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. तर चालक असलेली त्याची मैत्रिण शिवानी भानुशाली या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: उपवनकडून पवारनगरकडे जाणाऱ्या मोटारकारने रस्त्यावरील एका झाडाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये सुमित ढाकणकर (३३, रा. वसंतविहार, ठाणे) या कारमधील सहप्रवाशाचा मृत्यु झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. तर चालक असलेली त्याची मैत्रिण शिवानी भानुशाली (२५, रा. उन्नती वूड, ठाणे) या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपवनजवळील विरसा मुंडा चौकाजवळील ओपन जिम भागात रौनक पार्क येथे बुधवारी पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास उपवन कडून पवारनगरकडे शिवानी ही सुमित याच्यासह मोटारकारने जात होती. भरघाव वेगात असलेल्या मोटारकारवरील नियंत्रण सुटल्याने तिची झाडाला जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये चालक असलेली शिवानी आणि सहप्रवासी असलेला तिचा मित्र सुमित हे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सुमितचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चालक शिवानीने मद्य प्राशन केले होते किंवा कसे? याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्याविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात हयगयीने वाहन चालवून सुमित याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, रस्त्यामध्ये आलेल्या एका कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आपले कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पदपथावरील एका झाडावर आदळल्याने हा अपघात झाल्याचे जखमी शिवानीने पोलिसांना सांगितले.