भिवंडीमध्ये गोदाम कोसळून एकाचा मृत्यू , सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:24 AM2021-02-02T04:24:24+5:302021-02-02T04:26:56+5:30
Bhiwandi News : भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतानाच दापोडा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कम्पाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली.
भिवंडी - भिवंडीत जिलानी इमारत दुर्घटना ताजी असतानाच दापोडा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हरिहर कम्पाउंड येथे तळ अधिक एक मजली गोदाम इमारत कोसळल्याची दुर्घटना सोमवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. तर ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची शक्यता आहे. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवांनासह, भिवंडी व ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र तसेच ठाणे आपत्ती प्रतिसाद पथक आणि एनडीआरएफ पथक दाखल झाले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
दापोडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या हरिहर कम्पाउंड येथे गोदाम संकुल आहे. या गोदामात तळमजल्यावर शॅडोफॅक्स ऑनलाइन पार्सल कंपनी आहे. या कंपनीत ऑनलाइन साहित्य पार्सल करण्यात येत होते. सुमारे ७० हून अधिक कामगार या कंपनीत कामाला असल्याची माहिती मिळत असून, सोमवारी दुर्घटना झाल्यावेळी या कंपनीत सुमारे ५० ते ५५ कामगार उपस्थित होते. तर पहिल्या मजल्यावर मार्क इम्पेक्स ही टीव्ही व इलेक्ट्राॅनिक साहित्याची कंपनी होती. ज्यात सहा ते सात कामगार काम करत होते. टीव्ही कंपनीतील हे सर्व कामगार सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे, तर गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर बेकायदा बांधकामही सुरू होते. हे मजूर थाेडक्यात वाचले असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे तळमजल्यावर काम सुरू असताना अचानक गोदामाची इमारत कोसळली व परिसरात व कंपनीत गोंधळ उडाला. यावेळी २५ ते ३० कामगार धावत बाहेर पळाले. दुर्घटनेत सुनील कुमरा, कल्पना पाटील, रोशन पागी, अक्षय केनी, शैलेश तरे व इतर एक असे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात व ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ढिगाऱ्याखाली अजूनही चार ते पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. नारपाेली पाेलीस ठाण्यात या दुर्घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
२५ जणांना वाचविणाऱ्याचाच गेला जीव
कंपनीतील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षारक्षक सौरभ त्रिपाठी (वय ३०) याने सुमारे २० ते २५ लोकांना बाहेर काढले;
मात्र कामगारांना बाहेर काढताना ताेच ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.
इतरांना वाचवणाऱ्या त्रिपाठीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.