बारमधील वादातून एकाची हत्या, कल्याण पूर्वेतील घटना, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 04:38 AM2017-09-17T04:38:55+5:302017-09-17T04:39:01+5:30
मद्यपानानंतर नाचताना झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजता पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेमचंद गजरे (४१, रा. चक्कीनाका, कल्याण पूर्व) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कल्याण : मद्यपानानंतर नाचताना झालेल्या वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.३० वाजता पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रेमचंद गजरे (४१, रा. चक्कीनाका, कल्याण पूर्व) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी अक्षय आरोलकर (२२) आणि भावेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, उर्वरित तिघांचा कोळसेवाडी पोलीस शोध घेत आहेत.
कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.डी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक असलेले गजरे व त्यांचे मित्र गौरव भोसले हे शुक्रवारी रात्री एका बारमध्ये गेले होते. त्या वेळी मद्यपानानंतर नाचत असताना दुसºया ग्रुपमधील मद्यपींना धक्का लागला. त्यात ग्लासमधील मद्य सांडल्याने वादावादी झाली. बारचालक व कर्मचाºयांनी मध्यस्थी करून त्यांना शांत केले. मात्र, आरोपींच्या मनात राग खदखदत होता. बराच वेळाने बारमधून बाहेर आल्यानंतर पाच जणांनी गजरे आणि भोसले यांना पुन्हा लक्ष्य करत मारहाण केली.
चाकूने वार केल्याने गजरे व भोसले जखमी झाले. गजरे यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
सीसीटीव्हीमध्ये मारामारीचे फुटेज नाही
मारामारी व चाकूहल्ला झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली नाही.
मात्र, बाचाबाचीचा प्रकार कॅमेºयात टिपला गेला आहे. त्या फुटेजच्या आधारे अन्य तिघांचा शोध सुरू आहे. आरोलकर व पाटील यांना अटक झाली आहे, तर अन्य तिघेही लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.