बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत जेष्ठ नागरिकाची एक लाख २० हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 08:41 PM2020-12-30T20:41:09+5:302020-12-30T20:43:20+5:30
बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत पिता पुत्राची एक लाख २० हजारांची आॅनलाईन फसवणूक केल्याची घटना ठाण्यातील वर्तकनगर भागात घडली. वर्तकनगर पोलीस ठाण्यात २९ डिसेंबर रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बँक अधिकारी असल्याची बतावणी करीत एका ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकासह त्याच्या मुलाची एक लाख २० हजारांची आॅनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणूकीचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल झाला आहे.
वर्तकनगर येथील रहिवाशी असलेल्या या जेष्ठ नागरिकाच्या ३६ वर्षीय मुलाला राहूल वर्मा अशी ओळख सांगणाऱ्या भामटयाने २६ डिसेंबर रोजी दुपारी १ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान मोबाईलद्वारे संपर्क केला. त्याचवेळी संगणकाचे उपकरण आणि तंत्राचा वापर करुन आपण बँक अधिकारी असल्याचे त्यांना भासविले. त्यानंतर बँक खात्याची माहिती अद्ययावत करण्याचा बहाणा करीत त्यांचा मुलगा रोहन याच्या एचडीएफसी बचत खात्यात छेडछाड करुन २९ हजार ९९८ रुपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर याच खात्यातील आरडी खाते बंद करुन त्यातील रक्कम व बचत खात्यातील उर्वरित रक्कम असे ५० हजार रुपये तसेच त्यांचे दोघांचे एकत्र बचत खात्यातून ४१ हजार रुपये अशी ९१ हजारांची रक्कम ओटीपी क्रमांक घेऊन त्याद्वारे काढली. त्यांच्याकडून त्याने एक लाख २० हजार ९९८ रुपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी या जेष्ठ नागरिकाने २९ डिसेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.