रिक्षात राहिलेली एक लाखांची रोकड अवघ्या सहा तासांमध्ये मिळाली परत
By जितेंद्र कालेकर | Published: January 13, 2023 06:41 PM2023-01-13T18:41:52+5:302023-01-13T18:42:30+5:30
खारेगाव येथील रहिवाशी सदाशिव कांबळे (४३, रा. योग अपार्टमेंट, कळवा, ठाणे) यांची एक लाखांची रोकड असलेली बॅग रिक्षात विसरली होती.
ठाणे- खारेगाव येथील रहिवाशी सदाशिव कांबळे (४३, रा. योग अपार्टमेंट, कळवा, ठाणे) यांची एक लाखांची रोकड असलेली बॅग रिक्षात विसरली होती. ती अवघ्या सहा तासांमध्ये परत मिळवून देण्यात यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली.
ठाणे महापालिकेचे कर्मचारी घराच्या बुकींगसाठी दोन लाखांची रक्कम घेऊन १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खारेगाव येथील योग अपार्टमेंट येथून निघाले होते. या दरम्यान, ठाणे पोलीस स्कूल ते खारेगाव नाका असा रिक्षाने प्रवास करीत असताना खारेगाव नाका येथे रिक्षातून उतरले. त्याचवेळी त्यांची एक लाखांची एक बॅग कागदपत्रांसह रिक्षातच विसरली. मुलीच्या स्कूल बॅगेत ठेवलेली दुसरी एक लाखांची रोकड मात्र त्यांच्याकडे तशीच होती. रिक्षात पैशांची बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कळवा पोलिस ठाणे गाठूनही ही माहिती दिली.
त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक घुगे, पोलिस अंमलदार राहुल पवार आणि अमोल ढावरे यांनी यातील रिक्षाचा शोध घेण्यास सुरुवात केली. या पथकाने कांबळे रिक्षात बसलेल्या ठिकाणापासून ते जिथे उतरले तिथपर्यंतच्या खारकर आळीतील पोलिस स्कूल, कळवा नाका, मनीषा नगर आणि खारेगाव नाका या परिसरातील सुमारे ३५ सीसीटीव्हींमधील फूटेजची दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तपासणी केली. त्यावेळी त्यांनी प्रवास केलेल्या या रिक्षाचा शोध लागला.
या दरम्यान, इतरही प्रवासी या रिक्षात बसले. परंतू, रिक्षा चालक आणि इतर प्रवाशांच्याही निदर्शनास ही बॅग आली नाही. कळव्यातच ही रिक्षा एक ठिकाणी उभी असतांना चालकाकडे विचारपूस केली, त्यावेळी रिक्षातील ही बॅग जशीच्या तशी एक लाखांच्या रोकडसह त्याने पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी ती कांबळे यांच्याकडे सोपविली. त्यावेळी त्याने पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.