ठाण्यात लॉटरीमध्ये बुलेट मोटारसायकल लागल्याचे सांगून एक लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:23 PM2019-12-26T22:23:21+5:302019-12-26T22:29:21+5:30
लॉटरीमध्ये नामांकित कंपनीची मोटारसायकल लागली असल्याचे आमिष दाखवून ठाण्यातील टेकडीबंगला येथील तेजस सागळे (२२) या तरुणाची एक लाख दोन हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लॉटरीमध्ये बुलेट मोटारसायकल लागली असल्याची बतावणी करून पाचपाखाडीतील टेकडीबंगला येथील तेजस सागळे (२२) या तरुणाची एक लाख दोन हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी सागळे याने मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तेजस हा २१ डिसेंबर रोजी घरी असताना एका भामट्याने त्याला फोन करून लॉटरीमध्ये नामांकित कंपनीची मोटारसायकल लागली असल्याचे आमिष दाखविले. त्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरावे लागतील, असेही त्याला सांगितले. आपल्याला महागडी मोटारसायकल मिळणार असल्याच्या अपेक्षेपोटी त्या भामट्याने सांगितल्याप्रमाणे त्याने एक लाख दोन हजार ४९ रुपयांची रक्कम बँकेत भरली. २१ ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. पैसे भरल्यानंतर लॉटरीमध्ये लागलेल्या दुचाकीचा तेजसने त्याच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याला ही मोटारसायकल किंवा पैसेही त्याने परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेजसने याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.