मुलींच्या स्वच्छतागृहांसाठी रोटरीचे एक लाख
By admin | Published: October 11, 2015 12:12 AM2015-10-11T00:12:13+5:302015-10-11T00:12:13+5:30
लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमाला हातभार लावावा, या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ ठाणे मेट्रोतर्फे सामाजिक बांधिलकी ठेवून विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे : लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमाला हातभार लावावा, या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ ठाणे मेट्रोतर्फे सामाजिक बांधिलकी ठेवून विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत क्षयरोग तपासणी आणि सुखदा योजना राबविण्यात येत आहे.
आरआय डिस्ट्रीक्ट ३१४० च्या ‘टीबी भगाओ, जिंदगी बढाओ’ या योजनेंतर्गत लोकमान्यनगर, पाडा नंबर तीन येथील २०० नागरिकांची तपासणी केली. यामध्ये जे क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांना औषधे व पुढील तपासण्या पुरवल्या जाणार आहेत. डॉ. प्रज्ञा आपटीकर, त्यांचे सात सहकारी डॉक्टर आणि आठ रोटेरिअन्स या उपक्रमात सहभागी झाले होते.
या उपक्रमासाठी ठाणे महापालिकेने सहकार्याचा हात दिला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे भारतातून पोलिओ पूर्णपणे हद्दपार झाला आहे, त्याप्रमाणे भविष्यात क्षयरोग समूळ नष्ट होण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष व रोटरीयन हेमंत मोंडकर यांनी बोलताना व्यक्त केला.
ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने मुलींची पटसंख्या कमी होते. त्या शिक्षणापासून वंचित होतात. ही दुरवस्था लक्षात घेऊन डिस्ट्रीक्ट गव्हर्नर सुभाष कुळकर्णी यांनी ‘सुखदा’ ही योजना जाहीर केली आहे.
या योजनेंतर्गत मुलींसाठी सुसज्ज स्वच्छतागृहे बांधली जाणार आहेत. त्यासाठी रोटरी क्लब आॅफ ठाणे मेट्रो या संस्थेने एक लाख १० हजार रुपयांचा धनादेश कुळकर्णी यांच्या हाती सुपूर्द केला आहे. अनगाव येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत स्वच्छतागृहे बांधणे, जुम्मा येथील शाळेत ई-लर्निंगच्या दृष्टीने आवश्यक असणारी साम्रगी पुरविणे, अशा
भावी योजना क्लबने हाती
घेतल्या असल्याचे फर्स्ट लेडी आॅफ दी डिस्ट्रीक्ट स्वाती कुळकर्णी
यांनी सांगितले. या उपक्रमात
पूजा नेमावरकर, संदीप नेमावरकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
(प्रतिनिधी)