गहाळ झालेली एक लाखांच्या रोकडची बॅग वाहतूक पोलिसामुळे पुन्हा मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:35 PM2019-07-03T22:35:09+5:302019-07-03T22:39:23+5:30
एरव्ही, भ्रष्टाचारामुळे टीकेचे धनी होणाऱ्या वाहतूक पोलिसांकडे नेहमीच नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. परंतू, हीच नकारात्मकता सकारात्मक ठरु शकेल, अशी कौतुकास्पद कामगिरी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कुमावत यांनी केली. रस्त्यावर गहाळ झालेली एक लाखांच्या रोकड असलेली बॅग त्यांनी संबंधिताला परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ठाणे: राबोडी आकाशगंगा परिसरातील वसीम अन्सारी यांची एक लाखांची रोकड असलेली बॅग रस्त्यात गहाळ झाली होती. ती राबोडी उपविभागात नेमणूकीस असलेले पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कुमावत यांना बुधवारी मिळाल्यानंतर त्यांनी ती ओळख पटवून पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या समक्ष संबंधित बॅग मालक अन्सारी यांना सुपूर्द केली.
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या राबोडी उपविभागांतर्गत कार्यरत असलेले हवालदार कुमावत ३ जुलै रोजी राबोडीतील आकाशगंगा सोसायटी जवळून जात होते. यावेळी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास त्यांना रस्त्यात एक काळया रंगाची रेक्झिनची बॅग आढळून आली. कुमावत यांनी बॅग वरील बाजूंनी पडताळली असता, त्यात बॅग मालकाचा कोणताही नाव पत्ता आढळला नाही. बॅगेच्या मालकाचा पत्ता शोधण्यासाठी बॅग उघडली असता, त्यात एक लाखांची रोकड आढळली. बºयाच प्रयत्नानंतर कुमावत यांनी महागिरी येथील रहिवाशी असलेले बॅगेचे मुळ मालक अन्सारी यांना शोधून काढले. रस्त्याने जात असतांना त्यांची बॅग रस्त्यात गहाळ झाली होती. त्यांनी कुमावत यांच्याकडील बॅगेची ओळख पटवून त्यात एक लाखांची रोकड असल्याचेही सांगितले. तशी खात्री झाल्यानंतर कुमावत यांनी उपायुक्त काळे यांच्या समोरच अन्सारी यांना ही एक लाखांची रोकड असलेली बॅग सुपूर्द केली.