फक्त पाच रुपयांत एक लीटर पाणी
By admin | Published: May 27, 2017 02:08 AM2017-05-27T02:08:39+5:302017-05-27T02:08:39+5:30
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर सुरू करण्यात आलेल्या ‘जन जल योजने’चे लोकार्पण ज्येष्ठ प्रवासी दिलीप पामंग यांच्या हस्ते करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर सुरू करण्यात आलेल्या ‘जन जल योजने’चे लोकार्पण ज्येष्ठ प्रवासी दिलीप पामंग यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे मिनरल वॉटरपेक्षा कितीतरी स्वस्तात प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमास अन्य तातडीच्या कामामुळे खा. शिंदे उपस्थित राहू शकले नाही. या वेळी युवासेना जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख भाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे, महिला आघाडीच्या कविता गावंड आदी मान्यवर उपस्थित होते. या योजनेमुळे प्रवाशांना पाच रुपयांत एक लीटर शुद्ध पाणी मिळणार आहे. पाच लीटर पाण्यासाठी केवळ २० रुपये मोजावे लागणार आहेत. खाजगी कंपन्यांच्या एक लीटर पाण्याच्या बाटलीसाठी सध्या २० रुपये मोजावे लागतात. काही दिवसांपूर्वी खा. शिंदे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली, तेव्हा त्या ठिकाणी व्हिडीओ गेम चालवला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. आज पुन्हा लोकार्पण सोहळ्यास खासदारांसह शिवसैनिक येणार असल्याने स्थानकात स्वच्छता ठेवण्यात आली होती. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना तासाभरासाठी पिटाळून लावले होते.