डोंबिवलीतील दोन भावांचं मलेशियात अपहरण; सुटकेसाठी एक कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:34 AM2018-08-07T02:34:12+5:302018-08-07T06:52:32+5:30
परदेशात व्यापारासाठी गेलेल्या कौस्तुभ वैद्य व रोहन वैद्य या दोन भावांचे मलेशियात अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
डोंबिवली : परदेशात व्यापारासाठी गेलेल्या कौस्तुभ वैद्य व रोहन वैद्य या दोन भावांचे मलेशियात अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
डोंबिवलीत राहणाऱ्या वैद्य बंधूंची रॉक फ्रोझन फूड नावाची कंपनी असून फ्रोजन फूड डिमांड आणि सप्लाय हा त्यांचा व्यवसाय आहे. विशेषकरून मलेशिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांत दोन्ही बंधूंचे व्यवसायानिमित्त येणेजाणे असते.
काही दिवसांपूर्वीच वैद्य बंधूंच्या रॉक फ्रोजन फूड्स कंपनीला मलेशियातील ग्राहक मिस ली फ्रोझन फूड्स यांच्याकडून व्यवसायाकरिता फोन आला. फोन आणि मेलवरून औपचारिक व्यवहार पूर्ण झाल्यावर १ आॅगस्टला उरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी रोहन आणि कौस्तुभ मलिंडो एअर लाइन्सच्या विमानाने मलेशियाला गेले. तेथे ते दोघे ग्रॅण्ड आर्चेड नावाच्या हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती कौस्तुभने आपली पत्नी सायली यांना दिली. ठरल्याप्रमाणे २ आॅगस्टच्या दुपारी मलेशियातील ग्राहक मिस ली फ्रोजन फूडसोबत मीटिंग झाल्याचेही कौस्तुभने आपल्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर कळवले. त्यानंतर, संध्याकाळी ६ वाजता पुन्हा मिस ली फ्रोजन फूडच्या प्रतिनिधींसोबत मीटिंग असून मीटिंगनंतर जेवणार असल्याचे कौस्तुभने पत्नीला कळवले.
दि. २ आॅगस्टच्या रात्री साडेदहा वाजता रोहन आणि कौस्तुभचे वडील प्रकाश वैद्य यांच्या फोनवर मलेशिया येथील +६०११५१२२४९३६ या नंबरवरून फोन आला आणि पलीकडून घाबरलेल्या आवाजात कौस्तुभ बोलत होता. ‘‘आमचं अपहरण झालं आहे. एक कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे...’’ हा फोन येताच प्रकाश यांनी लगेच मलेशिया दूतावासाला फोन करून मुलांच्या अपहरणाची माहिती दिली. त्यांनी स्थानिक मलेशियन पोलिसांना तक्र ार करण्यास सांगितले.
यानंतरच, दि. ३ आॅगस्टच्या रात्री १०.२६ ते ११.०२ पर्यंत रोहनने वडील प्रकाश यांच्या +६०१९५५६८१०४ या नंबरवरून ११ फोन कॉल केले. प्रत्येक फोन कॉल २८ सेकंदांचा होता. यामध्ये रोहन आम्ही ४८ तासांत परत येतोय एवढंच सांगत होता.
दरम्यान, कौस्तुभच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये काढण्यात आले. त्यानंतर, अपहरणकर्त्याने फोन करून ०४१३२३८५४७ हा फोन नंबर दिला आणि या नंबरवरून जी व्यक्ती फोन करील आणि ती जो बँक अकाउंट नंबर सांगेल, त्या अकाउंटमध्ये एक कोटी रूपये ट्रान्सफर करायला सांगितले. पण, वरील नंबरवरून अजूनही फोन आला नाही आणि कौस्तुभ तसेच रोहनचादेखील पुन्हा फोन आलेला नाही.
याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कझाला आहे. मात्र, रोहन आणि कौस्तुभचे अपहरण नक्की कोणत्या कारणांमुळे झाले? अपहरणकर्ता कोण? याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.
>कुटुंबाचे वाटेकडे लक्ष
या दोघांच्या अपहरणाची बातमी कळताच वैद्य कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, दोनतीन दिवसांपासून त्यांच्या घरी नातेवाइकांची रीघ लागली आहे. त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.