ठाण्यात स्वाईन फ्लुने आणखी एकाचा मृत्यू; २१० रुग्णांची जिल्ह्यात नोंद
By अजित मांडके | Published: August 5, 2022 04:31 PM2022-08-05T16:31:29+5:302022-08-05T16:33:28+5:30
जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही रूग्णसंख्येत वाढ
अजित मांडके, ठाणे | लोकमत न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होत असतांना दुसरीकडे स्वाईनचा फैलाव मात्र वाढू लागल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसात स्वाईनच्या रुग्णात वाढ होत असतांना ठाण्यात आणखी एका मृत्युची नोंद झाली आहे. त्यानुसार ठाण्यातील एकूण मृत्यु हे आता चार झाले आहेत. जिल्ह्यात एकूण पाच मृत्यु आतार्पयत झाल्याचे दिसून आले आहे. तर एकूण रुग्ण संख्या आता २१० झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्लु या आजारामुले आरोग्य यंत्रणावरील ताण वाढू लागला आहे. मागील आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णांची संख्या ३४ इतकी होती. ३ जणांच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत होणारी वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य यंत्रांना प्रयत्नशील आहेत. दरम्यान गुरुवारी ठाणे महानगर पालिका हद्दीत स्वाईन फ्लुने एका रुग्णांचा बळी गेल्याने पालिका हद्दीतील मृतांची संख्या ४ इतकी झाली तर, जिल्ह्यातील मृतांचा आकडा ५ वर गेला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ठाणे महानगर पालिका हद्दीत गुरुवारी एकाच दिवशी सर्वाधिक ५१ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे रुग्णांची संख्या १४१ वर गेली. तर, मृत्युच्या संख्येत एक ने वाढ झाली असून मृतांची संख्या ४ वर गेली आहे. शहरात शुक्रवारी नोंद करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय ६१ होते. सहव्याधी असलेला हा रुग्ण होता. ताप आणि श्वसनास त्रास होत असल्यामुळे २५ जुलै ला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा तो स्वाईन फ्लू बाधित असल्याचे निष्पन झाले. परंतू, २६ जुलै ला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडे या रुग्णाच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ कल्याण - डोंबिवली पालिका हद्दीत ८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. त्यातच जिल्ह्यात सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, उर्वरित ९५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.