एक वही एक पेन : घरगुती गणेशोत्सवात ज्ञानाची पेटी, आदीवासी विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक मदत
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 5, 2019 03:56 PM2019-09-05T15:56:23+5:302019-09-05T15:58:09+5:30
यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील २० कुटुंबियांनी या उपक्रमात भाग घेतला आहे.
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे: यंदा घरगुती गणेशोत्सवात दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ठेवून शैक्षणिक साहित्य गोळा करुन ते साहित्य दुर्गम भागातील आदीवासी विद्यार्थ्यांना देण्याचा संकल्प ठाण्यातील २० कुटुंबियांनी केला आहे. गणपतीला हार, फुले, मिठाईपेक्षा वह्या, पेन, पेन्सिल देण्याचे आवाहन त्यांनी केले असून गणेशभक्तांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.
यावर्षी गणेशोत्सवात इकोफ्रेण्डली आणि समाजप्रबोधन याची सांगड घातली गेली आहे. घरगुती गणेशोत्सवातही सामाजिक भान जपले जात आहे. विकास धनवडे यांच्या संकल्पनेतून यंदा दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ही संकल्पना राबविली आहे. त्यांच्यासह २० घरगुती गणेशोत्सव साजरा करणारे कुटुंब जोडले गेले आहेत. या २० कुटुंबियांनी दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना वह्या, पेन, पेन्सील आणण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एक वेगळाच पायंडा यंदाच्या गणेशोत्सवात घातला गेल्याचे पाहायला मिळत आहे. धनवडे यांच्या घरी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यात साडे तीन डझन वह्या आणि ५० पेन ज्ञानाच्या पेटीत दिले. संदीप गोळे, नितीन सुतार, नैना मळार यांसारखे अनेक जणांनी या ज्ञानाच्या पेटीची संकल्पना आपाल्या घरगुती गणेशोत्सवात राबविली आहे. ठाम्यापासून १५० किमी अंतरावर आणि जव्हार पासून ४० किमी अंतरावर वसलेले बेहेरपाडा या आदीवासी गावातील विद्यार्थ्यांना ही मदत पोहोचविली जाणार आहे. ११०० लोकांची ही वस्ती असून या गावात २०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवाळीपूर्वी ही मदत या विद्यार्थ्यांना पोहोचविली जाणार असल्याचे या कुटुंबियांनी सांगितले. बेहेरपाडा हा अतिशय दुर्गम भाग असून येथील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. त्या शाळेतून त्यांना पुस्तके मिळतात पण वह्या, पेन , पेन्सील, दप्तरे मात्र मिळत नाही. त्यामुळे त्यांना हे शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही सर्वांनी मिळून केला असे धनवडे यांनी सांगितले. ही मदत झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोहोचविली जाणार आहे. झेप प्रतिष्ठानने या आधी देखील तेथील गर्भवती महिला, विद्यार्थ्यांना मदत दिली आहे. पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. तेथे मोबाईलला नेटवर्क नसल्याने ती समस्या प्राधान्याने सोडविली जाणार आहे, त्यांसाठी एका खाजगी मोबाईल कंपनीशी चर्चा सुरू आहे. तसेच, रोजगाराचा प्रश्नही युद्धपातळीवर सोडविण्याचा झेप प्रतिष्ठानचा मानस असल्याचे धनवडे यांनी सांगितले.