ठाणे पूर्व भागात एक ही व्यक्ती उपाशी झोपणार नाही - कोपरी पोलीस ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हाट्सउप ग्रुपच्या माध्यमातून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 03:55 PM2020-04-16T15:55:58+5:302020-04-16T15:58:00+5:30
जेष्ठ नागरीकांबरोबर इतरांची काळजी घेण्याचे काम सध्या कोपरी पोलिसांमार्फत सुरु आहे. जेष्ठांसाठी खास व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला असून त्या मार्फत गरजूंना मदत दिली जात आहे.
अजित मांडके
ठाणे : ठाणे पूर्व भागात आजवर एकही कोरोना बाधित रु ग्ण आढळून आला नाही. पोलिसांकडून शिस्तीचा बडगा उचलल्यानेच हे घडले आहे. मात्र बेशिस्तपणाबाबत पोलीस कितीही कठोर असले तरी त्यांची माणुसकीची दुसरी बाजूही कोपरीमध्ये पाहायला मिळाली आहे. कोपरीच्या हद्दीत एकही नागरिक उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मदत मिळण्यासाठी खास व्हॉट्सअॅप ग्रुप देखील बनविण्यात आला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे आज सर्वजण हतबल झाले आहेत. ही हतबलता दूर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्यती पाऊले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, ठाणे पूर्व परिसरातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये, याची खास दक्षता कोपरी पोलिस घेत आहेत. लॉकडाऊनचा आज २३ दिवसांचा काळ लोटला आहे. काहींच्या घरी अन्नधान्य आहे, तर गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. बेशिस्त लोकांमुळे कोरोनाचा व्हायरस येथे पसरू नये म्हणून पोलिसांनी लॉक डाऊनच्या पहिला दिवसपासूनच खबरदारी घेतली आहे. कोपरीमध्ये येणाऱ्या पाचही रस्त्यांची नाकाबंदी केली आहे. हे करत असतानाच मुंबईमध्ये जाणाºया गर्दीचे लोंढेही कोपरी पोलिसांनी पूर्वद्रुतगती मार्गावर अडवून मुंबईवरील ताण कमी करण्याचे काम केले आहे. कोपरितील गरीब आणि एकट्या नागरिकाची उपासमार होऊ नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून दररोज सुमारे २५० व्यक्तींना जेवण दिले जात आहे. शिवाय गरजू कुटूंबाला रेशन भरून देण्याची व्यवस्थाही करत आहेत. तांदूळ, पीठ, साखर, डाळ, तेल, मीठ इत्यादी अत्यावश्यक वस्तू आणून देत असून कोणी गरजू व्यक्तीने अन्न धान्याची मागणी केली तर ते देखील तात्काळ उपलब्ध करून दिले जाते.
ज्येष्ठ नागरिकांनी सांगावे लगेच पोलीस घरी हजर
ठाणे पूर्व परिसरात एकटे किंवा दोघे जण रहाणाºया ज्येष्ठाची काळजी आम्ही घेत आहोत. आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा व्हॉट्सअप गृप बनवला आहे. यात कोणाला कसली गरज वाटली तर त्यांनी ग्रुपवर मेसेज करायचा आहे. लगेच मेसेजला उत्तर दिले जाते. त्यांची विचारपूस करून त्यांची औषधे किंवा गरजेची कामे पोलीस करतात. तसेच आम्हाला फोन केला तरी आम्ही मदत करतो.
-जितेंद्र आगरकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक
आमची काळजी घेतात
माझ्या घरी मी आणि मिस्टर असे दोघेच रहातो. आताच्या दिवसात अनेक ज्येष्ठ नागरिकांना पोलीस मदत करत आहेत. आमचा अनुभव कोपरी पोलिसांबाबत खूप चांगला आहे.
- प्रतिभा पालव, ज्येष्ठ नागरिक