गुजरातमध्येही सुरू होणार ‘वन रूपी क्लिनिक’, मुंबईत २० स्थानकांवर सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 12:05 AM2020-03-01T00:05:56+5:302020-03-01T00:06:03+5:30
मध्य-पश्चिम-हार्बर या गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर दिसणाऱ्या मॅजिक दिल या संस्थेचे वन रूपी क्लिनिक लवकरच आता गुजरातमधील अहमदाबाद या रेल्वेस्थानकावरही दिसणार आहे.
पंकज रोडेकर
ठाणे : मध्य-पश्चिम-हार्बर या गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर दिसणाऱ्या मॅजिक दिल या संस्थेचे वन रूपी क्लिनिक लवकरच आता गुजरातमधील अहमदाबाद या रेल्वेस्थानकावरही दिसणार आहे. रेल्वे प्रवाशांना तातडीने उपचार देण्यासाठी अहमदाबाद रेल्वेस्थानकाबाबत क्लिनिक सुरू करण्यासाठी मागविलेल्या निविदा प्रक्रियेत एकमेव असलेल्या महाराष्टÑातील मॅजिक दिल संस्थेने बाजी मारली आहे.
रेल्वे अपघातात जखमी होणाºया अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने आणि वेळेवर उपचार मिळावेत, यातून मध्य रेल्वेवर वन रूपी क्लिनिक सुरू झाले आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत मुंबईत मध्य आणि पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वेमार्गांवर एकूण २० हून अधिक क्लिनिक सुरू झाले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेमार्गावर १३, तर पश्चिम रेल्वेमार्गावर सहा, हार्बरवरील एका रेल्वेस्थानकावर क्लिनिकचा समावेश असून तेथे प्रवाशांना मोफत २४ तास सेवा मिळत आहे. त्यातूनच, क्लिनिकचा पसारा वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून या संस्थेकडे गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, रातमल, राजकोट, दहोड, भावनगर या रेल्वेस्थानकांत क्लिनिकद्वारे वैद्यकीय सेवा देण्याबाबत प्रस्तावाद्वारे सुचवले होते. त्यानुसार मॅजिक दिल या संस्थेने निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. या शर्यतीत दोन स्थानिक संस्थाही स्पर्धेत होत्या. मात्र, मॅजिक दिल संस्थेने निविदा प्रक्रियेत बाजी मारल्याने अहमदाबाद येथील रेल्वेस्थानकावर क्लिनिक उघडण्याचा मार्ग सुकर झाला आहे. येत्या १५ दिवसांत अहमदाबाद येथे हे क्लिनिक सुरू होईल आणि तेथील रेल्वे प्रवाशांना वैद्यकीय सेवा देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
>शुक्रवारी मॅजिक दिल या संस्थेला अहमदाबाद रेल्वेस्थानकावर क्लिनिक सुरू करण्याबाबत टेंडर मिळाले. त्यानुसार येत्या १५ दिवसांत वन रूपी क्लिनिक तेथे सुरू करण्यात येईल. महाराष्टÑाबाहेर क्लिनिक सुरू करण्याचे स्वप्न त्यानिमित्त अखेर पूर्ण झाले.
- डॉ. राहुल घुले,
संचालक, मॅजिक दिल, संस्था