तारापूर येथील स्फोटात एक गंभीर जखमी, कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 05:36 AM2021-02-14T05:36:13+5:302021-02-14T05:36:52+5:30
Tarapur blast : तारापूर औद्योगिक क्षेत्रात बल्क ड्रग्स बनविणाऱ्या कारखान्यामध्ये एका रिॲक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीवर तारापूर अग्निशमन दलाने काही वेळातच नियंत्रण मिळविले.
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एन-२१६ मधील बजाज हेल्थकेअर लिमिटेड या कारखान्यांमध्ये शनिवारी दुपारी १च्या सुमारास रिॲक्टरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत एक गंभीर जखमी झाला असून, , त्याला मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर दुसऱ्या किरकोळ जखमीवर तारापूर येथील तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात बल्क ड्रग्स बनविणाऱ्या कारखान्यामध्ये एका रिॲक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीवर तारापूर अग्निशमन दलाने काही वेळातच नियंत्रण मिळविले. मात्र, या घटनेत नीलेश बोरसे (२९ वर्षे) ४० टक्के भाजला असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी तातडीने हलविण्यात आले आहे, तर महेंद्र दांडे (४५) हा किरकोळ जखमी झाला होता. आग विझविण्यासाठी तारापूर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. स्फोटाच्या निश्चित कारणाचा शोध औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी करीत आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे, याच कारखान्यामध्ये २ वर्षांपूर्वी विषारी वायुगळतीची दुर्घटना होऊन सुमारे ४० कामगारांच्या डोळ्यांना त्रास झाला होता, तर घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.