भार्इंदर पोलिसांकडुन दुचाकींवर एकतर्फी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 08:01 PM2018-02-19T20:01:30+5:302018-02-19T20:02:46+5:30
नियमांना बगल देऊन पार्कींग करुन वाहतुक तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांपैकी केवळ दुचाकींवर भार्इंदर पोलिसांनी दोन दिवसांपासुन कारवाई सुरु केली असुन या कारवाईमागे काहींनी तक्रार केल्याचे समोर आले आहे.
- राजू काळे
भार्इंदर - नियमांना बगल देऊन पार्कींग करुन वाहतुक तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांपैकी केवळ दुचाकींवर भार्इंदर पोलिसांनी दोन दिवसांपासुन कारवाई सुरु केली असुन या कारवाईमागे काहींनी तक्रार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अशा तक्रारींना प्राधान्य देऊन केलेल्या एकतर्फी कारवाईमुळे दुचाकीचालकांमध्ये रोष पसरला आहे.
भार्इंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उत्तन मार्गावरील पोलिस ठाणे ते भार्इंदर सेकंडरी शाळेदरम्यान वाहतुक रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्कींग करुन वाहतुकीचा रस्ता अरुंद केला जातो. याच मार्गावरील पोलिस ठाण्यासमोर उत्तनकडे जाणारा बस थांबा असुन या थांब्यालगतच रिक्षा स्टॅन्ड सुरु करण्यात आला आहे. येथे थांबणाऱ्या रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागत असुन त्या डबल पार्कींगप्रमाणे (अगोदरच पार्कींग केलेल्या खाजगी वाहनाशेजारी पार्कींग) रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यामुळे येथुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना पदपथाचा पर्याय उपलब्ध असला तरी दुकानदारांच्या पसाऱ्यामुळे तेथुन ये-जा करणे अडचणीचे ठरते. परिणामी नागरीकांना वाहतुकीच्या रस्त्यावरुनच ये-जा करावी लागते. या स्टॅन्डच्या विरुद्ध दिशेला देखील वाहनांची पार्कींग होत असल्याने एखादी बस, बसथांब्यावर थांबल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहतुक काहीवेळेपुरती ठप्प होते. त्यातच अनेक दुकानांसमोर खाजगी वाहने उभी केली जात असल्याने त्यांच्या व्यवसायावर त्या वाहनांच्या पार्कींगमुळे परिणाम होत असल्याचा दावा दुकानदारांकडुन केला जात असल्याने त्या वाहनांच्या प्रामुख्याने दुचाकी वाहनांच्या पार्कींगची तक्रार भार्इंदर पोलिस ठाण्यात अनेकदा केली जाते. त्याची दखल घेत भार्इंदर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासुन थेट येथील दुचाकी पार्कींगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईतून मात्र चारचाकी तसेच दुकानात वस्तू देण्यासाठी रस्त्यावर उभे करण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना हेतुपुरस्सर वगळण्यात येत असल्याने पोलिसांच्या या दुचाकींवरील एकतर्फी कारवाईवर दुचाकीचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे भार्इंदर पोलिस ठाणे ते सेकंडरी शाळेदरम्यानचा रस्ता ‘पार्कींग-नो पार्कींग’च्या कक्षात अद्याप आणण्यात आला नाही. तसेच स्थानिक वाहतुक शाखेने अद्याप तेथे फलक देखील लावले नाहीत. अशा स्थितीत पोलिसांनी केवळ तक्रारींवरुन केलेली एकतर्फी कारवाई सरसकट वाहनांवर केली जावी, तत्पुर्वी वाहनचालकांच्या माहितीसाठी ‘पार्कींग, नो-पार्कींग’चे फलक लावावेत, अशी मागणी दुचाकीचालकांकडुन करण्यात येऊ लागली आहे. याबाबत भार्इंदर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना संपर्क साधला असता त्यांनी, वाहतुक कोंडी होत असल्यानेच कारवाई सुरु करण्यात आल्याचे सांगुन त्याविरोधात तक्रारीदेखील येत असल्याचे सांगितले. सुरु केलेली कारवाई सर्वच वाहनांवर केली जात असुन चारचाकींवरील कारवाईसाठी जॅमरचा वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.