ठाणे ग्रामीणच्या वाहतूक विभागासाठी एक राज्य एक ई चलन योजना कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:04 PM2019-04-10T21:04:37+5:302019-04-10T21:09:53+5:30

राज्य मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करतांना कारवाईमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी तसेच वाहन चालकांवर डिजीटल चलनाद्वारे कारवाईसाठी केंद्र शासनाच्या डिजीटल इंडिया या संकल्पनेतून राज्यात ‘एक राज्य एक ई चलन’ ही योजना राबविण्यात येत आहे. डिव्हाईसच्या मदतीने आता वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर आॅनलाईन कारवाई केली जाणार आहे.

One State implemented an e-challan scheme for the Thane Rural Traffic Department | ठाणे ग्रामीणच्या वाहतूक विभागासाठी एक राज्य एक ई चलन योजना कार्यान्वित

पुराव्यासह कारवाईमुळे वादाला तसेच भ्रष्टाचारालाही आळा

Next
ठळक मुद्दे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते ४५ डिव्हाईस मशिनचे वाटपकाशीमीरा विभागात झाली सुरुपुराव्यासह कारवाईमुळे वादाला तसेच भ्रष्टाचारालाही आळा

ठाणे: एक राज्य एक ई चलन ही योजना ठाणे ग्रामीणच्या वाहतूक पोलिसांसाठी बुधवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते त्यासाठीचे ४५ डिव्हाईस मशिन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे आणि कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. याच डिव्हाईसच्या मदतीने आता वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर आॅनलाईन कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करतांना कारवाईमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी तसेच वाहन चालकांवर डिजीटल चलनाद्वारे कारवाईसाठी केंद्र शासनाच्या डिजीटल इंडिया या संकल्पनेतून राज्यात ‘एक राज्य एक ई चलन’ ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कारवाईसाठी या कार्यप्रणालीची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यप्रणालीमध्ये डिव्हाईसद्वारे वाहतूक नियमभंग करणा-या वाहन चालकांकडून दंड वसूल केला जातो. ही यंत्रणा कॅमेरा रेकॉर्डींग पुराव्यासह परिपूर्ण असल्यामुळे आणि यात किमान मानवी हस्तक्षेप असल्याने अधिक पारदर्शकता आहे. पुराव्यासह कारवाई होत असल्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यातील वादाला तसेच भ्रष्टाचारालाही आळा बसणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कार्यप्रणालीमुळे कारवाईची अमलबजावणी वाढल्याने वाहन चालकांमध्ये शिस्त वाढील लागून अपघातांनाही आळा बसणार आहे. वाहतूक पोलिसांच्या कारभारात पारदर्शकता आल्याने त्यांची प्रतिमा उंचावण्यासही वाव मिळणार आहे.
१० एप्रिलपासून ठाणे ग्रामीण जिल्हयात कार्यान्वित झालेली ही योजना प्रथम काशीमीरा विभागात सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्यामध्ये ४५ डिव्हाईस आणि प्रिंटर वापरण्यात येणार असून त्याद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे.
अशी मिळणार नागरिकांना सुविधा
या योजनेमुळे संबंधित वाहतूकीचे नियम तोडणा-याला डेबिट किंवा क्रेडीट कार्डद्वारे तडतोड रक्कम भरता येणार आहे. एमटीपी या अ‍ॅप्लिकेशनद्वारे संबंधितांना त्यांच्या वाहनावर अगर वाहन चालविण्याच्या परवान्यावर प्रलंबित असलेले चलन आॅनलाईन तपासून पाहता येणार आहे. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. विशेष म्हणजे ही योजना कार्यान्वित असलेल्या महाराष्टÑातील कोणत्याही जिल्हयात किंवा शहरात तडजोड रक्कम भरता येणार आहे.
 

‘‘ एक राज्य एक ई चलन ही योजना राबवितांना नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. तसेच तडतोड रक्कम भरण्यासाठी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य द्यावे. पुराव्यासह कारवाई होत असल्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यातील वादाला तसेच भ्रष्टाचारालाही आळा बसणार आहे.’’
डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

Web Title: One State implemented an e-challan scheme for the Thane Rural Traffic Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.