ठाणे-गायमुख कोस्टल रोडचे एक पाऊल पुढे; वाहतूक कोंडीतून सुटका होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 08:23 AM2022-02-19T08:23:50+5:302022-02-19T08:24:29+5:30
या प्रकल्पामुळे खारफुटी क्षेत्र बाधित होत असून ठाणे महापालिकेने कोस्टल रोडसाठी हरित क्षेत्र, कारशेड, मुंबई महापालिका जलवाहिनीच्या आरक्षणात बदल करण्याचे प्रस्ताव आधीच मंजूर केले आहेत
नारायण जाधव
ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी घोडबंदर ते गायमुख आणि गायमुख ते ठाणे या १३ किमी लांबीच्या कोस्टल रोडच्या मार्गातील वनजमिनीचा अडथळा लवकरच दूर होणार आहे. या मार्गासाठी लागणारी २२ एकर ११ गुंठे जमीन रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यासाठी महसूल व वन विभागाने अपर प्रधान वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली आहे, मात्र, महाराष्ट्र वन्यजीव मंडळाने या मार्गाचा आराखडा बदलून सहा ते आठ पदरी करण्यासह सध्याचा रस्ता कायमस्वरूपी बंद करून त्या जागी उन्नत मार्ग बांधण्याची शिफारस केली आहे. येत्या १५ दिवसांत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करणार आहे.
या प्रकल्पामुळे खारफुटी क्षेत्र बाधित होत असून ठाणे महापालिकेने कोस्टल रोडसाठी हरित क्षेत्र, कारशेड, मुंबई महापालिका जलवाहिनीच्या आरक्षणात बदल करण्याचे प्रस्ताव आधीच मंजूर केले आहेत. प्रस्तावित रस्ता आणि विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये तफावत निर्माण झाली असून ती दूर करण्यासाठी बाळकुम आणि खारी येथील हरित विभाग, कारशेड व मुंबई महापालिका जलवाहिनीसाठी आरक्षित ठेवलेले ४.७५०४ हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे.
सध्याचा रस्ता कायमस्वरूपी होणार बंद
ही समिती प्रस्तावित रस्त्याचे डिझाइन बदलून तो सहा ते आठ पदरी उन्नत करणे, त्यावरून जड व अवजड वाहने जातील हे पाहणे, सध्याचा रस्ता कायमस्वरूपी बंद करून तेथून वन्यप्राणी मुक्तसंचार कसे करतील, याचा अहवाल सादर करणार आहेत.
यांचा आहे समितीत समावेश
महसूल व वन विभागाने अपर प्रधान वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखाली जी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे, त्यात भारतीय वन्यजीव संस्था, डाॅ. बिलाल हबीब, वॉईल्ड लाईफ कन्झर्वेशन मुंबईचे डॉ. मनिष अंधेरिया, रस्ते विकास महामंडळाचा प्रतिनिधी, संजय गांधी उद्यानाचे वन संरक्षक व संचालक यांचा समावेश आहे.