ठाण्यातील ४० वृद्धांना ‘वन स्टेप टूवर्डस हेल्प’ व्हॉटसअॅप ग्रृपने दिला आधार
By जितेंद्र कालेकर | Published: April 17, 2020 09:06 PM2020-04-17T21:06:48+5:302020-04-17T21:29:39+5:30
कोरानाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या संचारबंदीमुळे अनेकांना घराबाहेर पडता आलेले नाही. अनेक ठिकाणच्या नागरिकांचे तर हातावर पोट असल्यामुळे त्यांच्या हाताला कामही नाही. जिथे दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न आहे. अशा लोकांसह सुमारे ४० जेष्ठ नागरिकांना ‘वन स्टेप टूवर्डस हेल्प’ या व्हॉटसअॅप गृ्रपच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे.
लोकमत न्यून नेटवर्क
ठाणे: संचारबंदीच्या काळात गरिब आणि गरजू लोकांना विशेषत: जेष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी ‘वन स्टेप टूवर्डस हेल्प’ या व्हॉटसअॅप ग्रृपची निर्मिती प्रा. प्रदीप ढवळ आणि वागळे इस्टेट पोलिसांनी केली. काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने या ग्रृपच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
कोरानाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या संचारबंदीमुळे अनेकांना घराबाहेर पडता आलेले नाही. अनेक ठिकाणच्या नागरिकांचे तर हातावर पोट असल्यामुळे त्यांच्या हाताला कामही नाही. जिथे दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न आहे. अशा लोकांना ‘वन स्टेप टूवर्डस हेल्प’ या व्हॉटसअॅप गृ्रपच्या माध्यमातून मदत करण्यात येत आहे. या ग्रृपमध्ये ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील आनंद विश्व गुरुकुलचे ३० ते ४० प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. एखाद्या भागातील जेष्ठ नागरिकाला जेवणाचा, वैद्यकीय मदत पुरविण्याचा किंवा औषधोपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठीची जर काही मदत लागली तर या ग्रृपद्वारे एकमेकांना कळविण्यात येते. ही माहिती मिळताच ग्रृपमधील सदस्य तातडीने संबंधित ठिकाणी मदतीचा हात देण्यासाठी धावपळ करतात. २५ मार्चपासून हे मदतकार्य सुरु आहे. या ग्रृपमुळे ४० ते ५० जेष्ठांना मदत झाल्याचे प्रा. ढवळ यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त जेवणासाठी सपत्नीक वागळे इस्टेट परिसरात भटकत असल्याचे गस्तीवरील वागळे इस्टेट पोलिसांना आढळले. त्यांना घरी जाण्यास सांगून त्यांचा केवळ पत्ता घेण्यात आला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये या जेष्ठ नागरिकाच्या घरी ‘वन स्टेप टूवर्डस हेल्प’च्या माध्यमातून वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी त्यांना मदत केली. ही मदत मिळाल्यानंतर धन्यवाद देतांनाच त्यांनी दहा वर्षांपूर्वी आपण सहायक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाल्याची ओळख पोलिसांना दिली. अशाच एका व्यक्तीचा राजस्थान येथून फोन आला. ठाण्यात दहावीच्या परिक्षेसाठी आलेला एक युवक अडकला असून त्यालाही मदतीची गरज असल्याचे पठाण निरोप मिळाला. या तरुणालाही संचारबंदी लागू झाल्यापासून दोन्ही वेळचे मोफत जेवण सुरु केल्याचेही पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘‘जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे शहरातील १४७ एकाकी राहणाऱ्या वृद्धांची माहिती मला दिली. ज्यांची मुले अन्य गावांमध्ये आहेत. काही कारणास्तव ते एकटेच आहेत. अशांना वैद्यकीय आणि इतरही मदत या गृ्रपच्या मदतीने पुरविण्यात येत आहे. ’’
प्रा. प्रदीप ढवळ, निर्माता, वन स्टेप टूवर्डस हेल्प, व्हॉटसअॅप ग्रृप