आठवड्यातून एकच टँकर; काशिमीरा येथील आदिवासीपाड्यातील परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:53 AM2019-04-26T00:53:51+5:302019-04-26T00:54:00+5:30
भाईंदर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
- धीरज परब
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत एकीकडे उत्तुंग इमारतींचे जाळे उभे राहत असताना दुसरीकडे काशिमीरा भागातील आदिवासीपाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना पुरेसे पाणीही महापालिकेत देऊ शकत नाही. आठवड्यातून केवळ एकच टँकर देऊन आपली जबाबदारी झटकणाºया महापालिकेमुळे आदिवासींच्या घशांना कोरड पडली आहे. कोरड्या विहिरी आणि बंद पडलेल्या बोअरिंगमुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पालिकेने या आदिवासींना निदान दोन दिवसाआड जरी टँकर दिले, तरी त्यांना दिलासा मिळेल.
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत नागरिकांना २४ तास पाणी देण्यासह पाणीयोजनांची आश्वासने राजकारण्यांकडून देण्यात आली. अनेक वर्षांपासून पाणी हा शहरातील राजकारणाचा मुख्य मुद्दा राहिलेला आहे. शहराला आज एमआयडीसीकडून सुमारे ९०, तर स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष पाणी मिळते. अपुरे असले तरी पाणी निदान एकदोन दिवसांआड पालिका ते देत आहे.
परंतु, काशिमीरा भागातील माशाचापाडा, म्हस्करपाडा, वरठापाडा, पागेरापाडा, सावरेपाडा हे जवळपास असलेले आदिवासीपाडे मात्र पाण्यावाचून तहानलेलेच आहेत. म्हस्करपाडा भागात सुमारे १५ आदिवासींची घरे आहेत. येथे पालिकेने आजही जलवाहिनी टाकलेली नाही.
पाण्याची टाकी पालिकेने बसवली असली, तरी पाणी मात्र आठवड्यातून एकदाच पालिका देते. आठवड्यातून एक टँकर पालिकेचा येतो. एका टँकरच्या पाण्यावर आठवडा कसा चालवायचा, असा प्रश्न रहिवाशांना सतावत आहे. आता तर पालिकेने बसवलेली पाण्याची टाकीही दोन दिवसांपूर्वी फुटून गळू लागली आहे.
वरठापाड्यात १० घरे आदिवासींची आहेत. येथेही पालिका आठवड्याने एक टँकर देते. येथे असलेले बोअरिंगही बंद आहे. मांडवीपाड्यातील २५ आदिवासी घरांनाही नळजोडणी नसून त्यांच्यासाठी आठवड्यानेच पाण्याचा टँकर दिला जातो. येथील सावरेपाडा, पागेरापाडा या आदिवासीपाड्यांची स्थितीसुद्धा वेगळी नाही. सावरेपाड्यातील बोअरिंगला पाणीच नाही, तर पागेरापाड्यातील बोअरिंगला अशुद्ध पाणी येत असल्याचे आदिवासी सांगतात.
माशाचापाडा भागात आदिवासींची सुमारे वीसेक घरे आहेत. यातील काही घरे वनविभागाच्या हद्दीत असली तरी पूर्वापार आदिवासीबांधव येथे राहत आहेत. वनविभागाची हद्द असल्याने कायद्याप्रमाणे त्यांना वीजपुरवठा होत नाही. वीजमीटर लागावे म्हणून एकाला पैसे देऊन झाले. पण, अजून त्याने वीज मिळवून दिली नाही आणि त्यांचे पैसेही परत केले नाहीत. या ठिकाणी पाण्यासाठी एक विहीर आहे. पण, विहीर पार कोरडी पडली आहे. पालिकेने मारून दिलेल्या बोअरिंगला पाणीच येत नाही. याठिकाणी पालिकेने टाकी बसवली आहे. पण, टँकर मात्र आठ दिवसांनी दिला जातो.
पालिका जलवाहिनी टाकण्याचा खर्च बिल्डर आणि व्होट बँक असणाºया भागांसाठी करते. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली दोन ते चार दिवसच नव्हे, तर महिनाही पालिकेने फुकट पाण्याचे टँकर पुरवले आहेत. पण जे शहराचे भूमिपुत्र आहेत, त्या आदिवासींना नळजोडण्या देणे अजून शक्य झालेले नाही. टाकीतील पाणी संपले की, पाण्यासाठी आदिवासी महिला व मुलींची भटकंती सुरू होते. आठवड्याने दिला जाणारा टँकर निदान दोन दिवसांआड मिळाला तरी घशाला पडणारी कोरड थांबेल, अशी भावना काही आदिवासींनी व्यक्त केली.
माशाचापाडा आदी भागांतील आदिवासींना नळजोडण्या देण्याचा प्रयत्न आपण १९९७ पासून करतोय. पण, येथील पाटील नावाच्या खाजगी जमीनमालकाचा त्यांच्या जागेतून जलवाहिनी टाकू देण्यास विरोध आहे. प्रशासनही त्यांच्यासमोर नतमस्तक होते.
- ज्योत्स्ना हसनाळे, नगरसेविका
पालिकेने मारून दिलेल्या बहुतांश बोअरिंग बंद पडल्या आहेत. विहिरीला पाणी नाही. ज्या दोनेक बोअरिंग सुरू आहेत, त्यांना दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येते. पुढचे दोन महिने तर आणखी बिकट जातील. इतकी मोठी महापालिका झाली. पण, आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जात नाही.
- हरी पागेरा, स्थानिक नागरिक
विहिरीला पाणी नाही. बोअरिंगला पाणी नाही. पालिकेने टाकी बसवली आहे, पण आठ दिवसांनी टँकर येतो. पाणी पुरणार तरी कसे? पाण्याची काटकसर किती करणार? पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाण्यासाठी नागरिकांकडे भीक मागावी लागते. साहेब लोक काय बाटलीबंद पाण्याने अंघोळ करतील. पण, आम्ही घशाची कोरड कशी भागवायची. - आशा बरफ, आदिवासी