एक चाचणी पॉझिटिव्ह, दुसरी निगेटिव्ह; संशयित बुचकळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 02:02 AM2020-07-21T02:02:37+5:302020-07-21T02:02:42+5:30
‘अॅण्टीजेन’च्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह
कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडीत राहणाऱ्या विवेक कांबळे (२६) यांनी केडीएमसीच्या रुग्णालयात केलेली कोरोनाची अॅण्टीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, खाजगी लॅबमध्ये केलेल्या स्वॅब चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे नेमक्या कोणत्या चाचणीचा अहवाल खरा आहे, कोरोना झाला आहे की नाही, अशा संभ्रमात ते पडले आहेत. दरम्यान, याविरोधात कोरोना संघर्ष समितीने आवाज उठविला असून अॅण्टीजेन चाचणीच्या विश्वसनीयतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांची चाचणी करण्यावर केडीएमसीने भर दिला आहे. मनपाच्या हद्दीत सध्या सहा स्वॅब कलेक्शन सेंटर असून, आणखी दोन सेंटर वाढवण्याचा विचार आहे. तसेच मनपाने १० हजार अॅण्टीजेन टेस्ट किट खरेदी केले आहेत.
कांबळे यांनी १८ जुलैला मनपाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अॅण्टीजेन चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सेकंड ओपिनियन म्हणून त्यांनी २४ तासांत खाजगी लॅबमध्ये स्वॅब टेस्ट केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे ते संभ्रमित पडले. भिन्न अहवालांमुळे त्यांनी कोरोना संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांच्याकडे दाद मागितली आहे.
काकडे यांनी सांगितले की, कांबळे यांनी केडीएमसीच्या रुग्णालयातील अॅण्टीजेन चाचणीच्या अहवालावर विश्वास ठेवून उपचार सुरू केले
असते, तर त्यांची खाजगी रुग्णालयांनी लूट केली असती. तसेच कोरोना नसतानाही त्यांच्यावर कोरोनाचे उपचार केले गेले असते. त्याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला असता. याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, याबाबत केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या की, अॅण्टीजेन
टेस्टमध्येही घशातील स्वॅब घेऊन तो एका रसायनामध्ये बुडविला जातो. तो त्या किटवर ठेवला की, दोन लाइन आल्यावर रुग्ण पॉझिटिव्ह, तर एक लाइन आल्यावर रुग्ण निगेटिव्ह आहे, असे समजले जाते.रुग्णाची दुसरी चाचणी करणे गरजेचे ठरते. संबंधित रुग्णाला २४ तासांनंतर लक्षणे दिसून आली नसल्याने त्यांचा अहवाल खाजगी लॅबमध्ये निगेटिव्ह आला आहे. त्यात चुकीचे काही घडलेले नाही.
‘...तर किटची पुढील खरेदी करू नये’
चाचणीची विश्वसनीयता नसेल तर पुढील टप्प्यातील ५० हजार किटची खरेदी करून नागरिकांच्या पैशांची वाट लागू नये, अशी मागणी कोरोना संघर्ष समितीने केली आहे.