जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांत एक हजार २६३ महिलांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:44 AM2021-08-24T04:44:38+5:302021-08-24T04:44:38+5:30
ठाणे : रक्षाबंधनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने खास महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. त्यानुसार ...
ठाणे : रक्षाबंधनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने खास महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. त्यानुसार रविवार आणि सोमवार या दोन दिवसांत तब्बल १२६३ महिलांचे लसीकरण केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. त्यातही मागील काही महिन्यांपासून लसीकरण मोहिमेत महिलांचा आकडा हा काहीसा कमी असल्याचे दिसून आले आहे. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेने महिन्यातून शेवटच्या आठवड्यात एक दिवस महिलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी महिलांचे लसीकरण करण्यात आले. दुसरीकडे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयानेदेखील रक्षाबंधनाची अनोखी भेट म्हणून दोन दिवस खास महिलांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार या मोहिमेत तब्बल एक हजार २६३ महिलांचे लसीकरण करण्यात आले. ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विलास साळवे, परिचारिका शलाका पावसकर, सुजाता शिंगाडे, नीलम वेंडे, गुणा गद्री, निलीम नगराळे, भाट, चांदोरकर आणि बाबू मेट्रन यांच्या टीमने रक्षाबंधनाच्या दिवशी ५३० महिलांचे लसीकरण करून बहिणींना अनोखी भेट दिली, तर दुसऱ्या दिवशी सोमवारीदेखील केवळ महिलांचे लसीकरण मोहीम राबवून ७३३ महिलांचे असे दोन दिवसांत एक हजार २६३ महिलांचे लसीकरण केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.