भिवंडीतील कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीजग्राहकांसाठी एक हजार कोटीची व्याज माफी; आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश
By नितीन पंडित | Published: November 17, 2023 07:12 PM2023-11-17T19:12:33+5:302023-11-17T19:12:47+5:30
आमदार रईस शेख यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करीत शासनाने भिवंडी शहरातील विज ग्राहकांसाठी व्याजमाफीचा निर्णय घेण्याची मागणी केली होती.
भिवंडी : शहरातील वीजवितरण कंपनी काळात कायम स्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांसाठी व्याज माफीची योजना जाहीर केली असून ,यामुळे तब्बल १ हजार कोटी रुपयांची सवलत भिवंडीतील वीज ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शुक्रवारी दिली आहे. भिवंडी विभागातील वीज वितरण २००७ पासून फ्रेंचायसी असलेल्या टोरंट पॉवर कंपनी कडून केले जात आहे. या भागातील वीज ग्राहकांनी कायम स्वरुपी खंडित केलेल्या वीज जोडणीची थकबाकी रक्कम व त्यावरील व्याज वाढत गेल्याने सदरची रक्कम वसूल करण्यात अडचण येत होती. तर अशा ग्राहकांना नवीन वीज जोडणी मिळत नसल्याने अनेक वीज ग्राहकांची १६ वर्षांपासून कुचंबणा होत होती.
या विषयावर स्थानिक आमदार रईस शेख यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करीत शासनाने भिवंडी शहरातील विज ग्राहकांसाठी व्याजमाफीचा निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन नागरिकांच्या हिताचा निर्णय घेईल असे आश्वासन दिले होते.त्यानंतर वीजवितरण कंपनीने एक पत्रक जारी करून कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी योजना जाहीर केली आहे .ज्यामध्ये मुळ रक्कम व त्यावर दहा टक्के व्याज देऊन उर्वरित व्याज माफी दिली जाणार आहे. यामुळे भिवंडीतील वीज ग्राहकांना तब्बल १ हजार कोटी रुपयांची सवलत मिळणार असून त्यामुळे नवीन वीज जोडणी घेणे वीज ग्राहकांना सहज शक्य होणार आहे अशी माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.