रक्षाबंधनानिमित्त एक हजार महिलांचे लसीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:43 AM2021-08-23T04:43:00+5:302021-08-23T04:43:00+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने रक्षाबंधनाची भेट म्हणून शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत एक हजार लसी देण्यात येणार आहेत. ...
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने रक्षाबंधनाची भेट म्हणून शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत एक हजार लसी देण्यात येणार आहेत. सोमवारी महिलांसाठी ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.
रविवारी रक्षाबंधन असल्याने अंबरनाथ नगरपालिकेने सोमवारी विशेष लसीकरण मोहीम राबवली आहे. या विशेष लसीकरण मोहिमेमध्ये शहरातील एक हजार महिलांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. रक्षाबंधनाची भेट म्हणून अंबरनाथ नगरपालिकेने ही विशेष मोहीम राबविली आहे. आतापर्यंत नगरपालिकेने राबविलेल्या लसीकरण मोहिमेत पाचशेच्या वर लस कधीच दिली नाही. मात्र प्रथमच एकाच दिवशी एक हजार लसी देण्याचा संकल्प पालिकेने राबवला आहे. या मोहिमेंतर्गत केवळ महिलांनाच लस देण्यात येणार असल्याने सोमवारी महिलांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी केले आहे.
या मोहिमेची जबाबदारी पालिकेची असून, त्यात महिलांना त्रास होणार नाही या अनुषंगाने विशेष लक्ष दिले जात आहे. सकाळी सात वाजता या लसीकरणासाठी टोकनचे वाटप करण्यात येणार असून पहिल्या २०० महिलांना थेट लसीकरण कक्षात प्रवेश दिला जाणार आहे, तर २०१ ते हजारपर्यंतचे टोकन महिलांना वाटप करण्यात येणार आहे. त्यातही महिलांची गर्दी होऊ नये त्यासाठी टोकन क्रमांक २०१ ते ४०० पर्यंतच्या टोकनधारकांना सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत लस दिली जाणार आहे. ४०१ ते सहाशे क्रमांकाच्या टोकनधारकांना दुपारी १ ते ३ या वेळेत लस दिली जाणार आहे. तर ६०१ ते १००० क्रमांकाच्या टोकनधारकांना दुपारी तीन ते लसीकरण संपेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या लसीकरणाचे टोकन सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत वाटप करण्यात येणार आहे.