तीनपैकी एक पूल वाहतुकीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:46 AM2018-05-29T01:46:37+5:302018-05-29T01:46:37+5:30
ठाणे शहरात तीन उड्डाणपूल जवळपास बांधून तयार आहेत, मात्र अगोदर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नेते व्यस्त असल्याने व आता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने त्यांचे औपचारिक उद्घाटन लांबणीवर पडले आहे.
ठाणे : ठाणे शहरात तीन उड्डाणपूल जवळपास बांधून तयार आहेत, मात्र अगोदर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नेते व्यस्त असल्याने व आता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने त्यांचे औपचारिक उद्घाटन लांबणीवर पडले आहे. मात्र दुचाकीचालकांनी चोरीछुपे त्यापैकी एका पुलावरून वाहतूक सुरू आहे.
मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोलपंप, नौपाडा टेलिफोन एक्स्चेंज या तीन उड्डाणपुलांपैकी तीन पेट्रोलपंप म्हणजेच वंदना ते मखमली तलावपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरून दुचाकींची ये-जा सुरू झाली आहे. परंतु, उर्वरित दोन पुलांचे काम काहीअंशी शिल्लक आहे.
हे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २४ डिसेंबर २००७ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार, हे काम एमएसआरडीसीमार्फत करण्यात येणार होते. परंतु, या तीन उड्डाणपुलांचा खर्च अधिक असल्याने एमएसआरडीसीने ते करण्यास नकार दिला. त्यानंतर, एमएमआरडीएने या उड्डाणपुलांमध्ये बदल सुचवून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांच्या कार्यकाळात या तीन उड्डाणपुलांऐवजी येथे एकच तीन किमीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. याचा प्रस्तावही तयार झाला. परंतु, पूर्वीच्या खर्चापेक्षा या एका उड्डाणपुलाचा खर्च हा दुप्पट झाल्याने एमएमआरडीएने निधी देण्यास नकार दिला. त्यात पालिकेच्या तिजोरीतही तेवढी रक्कम नसल्याने हा प्रस्ताव कागदावरच राहिला. परंतु, भविष्यात येथील वाहतूककोंडी लक्षात घेता, या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त झाल्यानंतर पुन्हा पालिकेने पुन्हा तीन उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावानुसार काँक्रिटऐवजी स्टीलचे डिझाइन तयार केले. म्हणजेच या उड्डाणपुलांचे प्रत्येक गर्डर हे स्टीलमध्ये तयार केले जाणार होते. परंतु, याचाही खर्च अवास्तव होत असल्याने आम्ही सुमारे २०० कोटीपर्यंतचा निधी देऊन त्यावरील सर्व खर्च पालिकेने करावा, असे प्राधिकरणाने पालिकेला कळवले. तसेच प्लॅनमध्ये काही बदलही सुचवले होते. आता हे पूल पूर्णत्त्वाला जाण्याच्या मार्गावर असून, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.