दर चार मिनिटांमध्ये अपघातात एकाचा बळी ही चिंतेची बाब- एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 09:38 PM2021-02-17T21:38:09+5:302021-02-17T21:44:07+5:30
दरवर्षी दीड लाखांहून अधिक बळी रस्ते अपघातात जातात आणि सहा लाख कोटी रु पयांचे नुकसान होते. दर चार मिनिटाला एक बळी जातो, ही चिंतेची बाब असून दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या संपूर्ण विकासाच्या माध्यमातून रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यल्प करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दरवर्षी दीड लाखांहून अधिक बळी रस्ते अपघातात जातात आणि सहा लाख कोटी रु पयांचे नुकसान होते. दर चार मिनिटाला एक बळी जातो, ही चिंतेची बाब असून दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या संपूर्ण विकासाच्या माध्यमातून रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यल्प करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात केले.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा अभियान २०२१ या महिनाभर सुरू असलेल्या मोहिमेचा समारोप बुधवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ठाणे शहर आणि परिसरात अनेक प्रकल्प सुरू आहेत. मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचेही नियोजन आहे. फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, कोपरी-पटणी खाडी पूल, कोलशेत-गायमुख कोस्टल रोड, आनंदनगर ते साकेत एलिव्हेटेड रोड, कोपरी पूल रु ंदीकरण अशा अनेक प्रकल्पांमुळे वाहतूककोंडीची समस्या सुटायला मदत होणार आहे. रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी व्हावी, यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होईल आणि अपघातांची संख्या कमी होण्यासही मदत होईल. रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्स ही चिंतेची बाब असून नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या अपघाताच्या जागा राहाणार नाहीत, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
* बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या ७०१ किमीच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून राज्यात याच धर्तीवर पाच हजार किमीच्या अक्सेस कंट्रोल रस्त्यांचा, तसेच मुंबई-गोवा अक्सेस कंट्रोल रस्त्याच्या डीपीआरचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. अपघात रोखण्यासाठी अद्ययावत सिग्नल यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी रु पयांचा निधी, तसेच ठाणे ते कसारा या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दोन कोटी रु पयांचा निधी मंजूर केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
* कोरोना काळातही पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून उल्लेखनीय काम केले. कम्युनिटी किचन सुरू व्हायच्या आधी पोलिसांनी गोरगरिबांना अन्न द्यायला सुरु वात केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान केले. त्यामुळे पोलिसांसाठी आपण जेवढे करू, तेवढे कमीच आहे, असे गौरवोद्गार काढत शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून गृहप्रकल्पांमध्ये पोलिसांसाठी खास कोटा ठेवला असल्याचेही सांगितले.
* आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, वाहतूक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळेच वाहतूक पोलिसांचे काम आव्हानात्मक असते. शहरीकरणामुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीची समस्या जटील होत आहे. पण आमचे वाहतूक पोलिस सातत्याने हे आव्हान पेलत आहेत. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही पोलिस मागे हटले नाहीत. सेवा बजावताना ठाणे पोलिस दलातील १७९८ पोलीस कोरोनाबाधित झाले, तर दुर्दैवाने ३४ जणांचा मृत्यु झाला.मात्र, तरीही आमचा विभाग मागे हटला नाही, असे ते म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचेही समयोचित भाषण झाले. करोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचार्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
* आॅनलाइन माध्यमातून रस्ते सुरक्षेविषयक लघुपट, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या विजेत्यांना पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच, वाहतूक पोलिसांचे कार्य व रस्ते सुरक्षेबाबत जागरु कता निर्माण करणार्या लघुनाटिका व नृत्यसंगीत कार्यक्र माचे सादरीकरण करण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या आजवरच्या इतिहासाची उकल करणार्या ध्वनिचित्रिफतीच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच, अभिनेते प्रसाद खांडेकर व पंढरीनाथ कांबळे यांच्या सादरीकरणालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. वाहतूक विभागाला विशेष सहकार्य करणार्या नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सहआयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त आयुक्त दत्ता कराळे, संजय येनपुरे, अनिल कुंभारे, प्रवीण पवार तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि या मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर मंगेश देसाई आदी उपस्थित होते.