उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबाराला वर्ष पूर्ण, पोलीस उपायुक्त कार्यालयावर महेश गायकवाडसह समर्थकांचा जनमुक मोर्चा
By सदानंद नाईक | Updated: February 2, 2025 20:44 IST2025-02-02T20:44:25+5:302025-02-02T20:44:35+5:30
एका वर्षानंतर आरोपी फरार कसा?

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबाराला वर्ष पूर्ण, पोलीस उपायुक्त कार्यालयावर महेश गायकवाडसह समर्थकांचा जनमुक मोर्चा
सदानंद नाईक
उल्हासनगर : राज्यात नव्हेतर देशात खळबळ उडून देणाऱ्या हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणाला २ फेब्रुवारीला ऐक वर्ष झाले. ऐक वर्ष उलटूनही तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड या आरोपीला अटक का नाही? असा प्रश्न करीत महेश गायकवाडसह समर्थकांनी रविवारी पोलीस उपायुक्त कार्यालयावर जनमुक मोर्चा काढला. यावेळी महेश गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देत न्यायची मागणी केली.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी २ फेब्रुवारी २०२४ साली रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड व शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जमिनीचा वाद प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी कार्यालयात बोलाविले होते. यावेळी गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्यात वाद होऊन गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयात महेश गायकवाड व सहकाऱ्यावर गोळीबार केला. या घटनेचे पडसाद राज्यात नव्हेतर देशात उमटून खळबळ उडाली. गोळीबार करणारे तत्कालीन भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली. तर गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाडसह सहकारी राहुल पाटील यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात तर नंतर दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
गेल्या एका वर्षापासून गणपत गायकवाडसह अन्य जण जेल मध्ये आहेत. मात्र आरोपी असलेला वैभव गायकवाड गेल्या एका वर्षापासून फरार आहे. पोलिसांनी वैभव गायकवाड यांच्या विरोधात आउटलूक नोटीस, संपतीची जप्तीची कारवाई केली नाही. तसेच सरकारने एसआयटी व सीआयडी मार्फत तपास सुरु केली नसल्याची खंत महेश गायकवाड यांनी व्यक्त केली. गोळीबार घटनेला ऐक वर्ष झाल्या निमित्त महेश गायकवाडसह समर्थकांनी रविवारी दुपारी अनिल-अशोक चित्रपटगृह ते पोलीस उपायुक्त कार्यालय दरम्यान जनमूक मोर्चा काढून फरार आरोपीला अटक करून न्याय देण्याची मागणी केली. मोर्चात महिलासह शेकडो जण सहभागी झाले होते. यावेळी महेश गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली.
बिडच्या धर्तीवर हवा तपास....महेश गायकवाड
हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणाला २ फेब्रुवारी रोजी ऐक वर्ष झाले. मात्र यातील वैभव गायकवाड या मुख्य आरोपीला अटक झाली नाही. बीडच्या धर्तीवर तपास होऊन एसआयटी, सीआयडी तपास करण्याची मागणी महेश गायकवाड यांनी केली.