अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Published: July 19, 2023 09:45 PM2023-07-19T21:45:25+5:302023-07-19T21:45:50+5:30
कोपरीतील घटना: ठाणे विशेष न्यायालयाचा निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोपरीतील एका १३ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या संदेश बाळाराम दुर्गे (वय २३) या आरोपीला ठाण्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि विशेष पॉक्सो न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी एक वर्ष कारावासाची तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ५० दिवसांच्या कारावासाची शिक्षाही आरोपीला देण्यात आल्याची माहिती विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी दिली.
कोपरीच्या एका शाळेत आठवीच्या वर्गात ही १३ वर्षीय पीडित मुलगी शिकायला होती. ८ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०१६ या दरम्यान रोज दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ती तिच्या मैत्रिणींसोबत पायी घरी जात असताना आरोपी तिचा पाठलाग करीत असे. याच काळात त्याने मोटारसायकलवरून येत मोबाइल क्रमांक मागून तिची छेड काढीत विनयभंग केला होता. याप्रकरणी ११ ऑगस्ट २०१६ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरी पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी १९ जुलै २०२३ रोजी ठाण्याच्या विशेष पॉक्सो न्यायाधीश विरकर यांच्या न्यायालयात झाली. ११ साक्षीदारांची विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी तपासणी केली. सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपी संदेशला न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.