जन्मदातीच्या प्रतिक्षेत पुण्यातील एक वर्षाची मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 12:59 AM2021-06-07T00:59:03+5:302021-06-07T00:59:55+5:30
ठाण्याच्या रामनगर भागात राहणाऱ्या सुकन्या अजय जाधव (२२, नावात बदल) या कथित विवाहितेने मुलीला जन्म दिल्यानंतर तिने तिच्या काव्या या मुलीला पुण्याच्या ससून रुग्णालयाजवळील ‘सोफोश’ या संस्थेत एक वर्षभरापूर्वी म्हणजे ३१ मार्च २०२० रोजी ठेवले. मात्र, कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण न करताच ती बेपत्ता झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्याच्या रामनगर भागात राहणाऱ्या सुकन्या अजय जाधव (२२, नावात बदल) या कथित विवाहितेने मुलीला जन्म दिल्यानंतर तिने तिच्या काव्या या मुलीला पुण्याच्या ससून रुग्णालयाजवळील ‘सोफोश’ या संस्थेत एक वर्षभरापूर्वी म्हणजे ३१ मार्च २०२० रोजी ठेवले. मात्र, कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण न करताच ती बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोफोश या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील रामनगर येथील या कथित विवाहितेने ९ मार्च २०२० रोजी पुण्याच्या ससून रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर आपण बाळाची काळजी घेण्यास असमर्थ असल्याने काव्या या मुलीला पुण्याच्या बाल कल्याण समितीच्या आदेशाने सोफोश या संस्थेत काळजी व संरक्षणासाठी दाखल करीत असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये तिने आपल्या मुलीला या संस्थेत ठेवले. परंतू, त्यानंतर सुकन्या हिच्याशी संपर्क होत नसल्यामुळे काव्या हिच्या पुढील पुनर्वसनाबाबतचा निर्णय घेण्यात काही अडचणी येत आहेत. मुलीच्या आईच्या शोधासाठी बंडगार्डन पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली आहे. तरी मुलीच्या आईने किंवा तिच्या अन्य पालकांनी या संस्थेकडे सोफोश, ससून रुग्णालय, पुणे येथे किंवा बाल कल्याण समिती येरवडा, पुणे येथे सपर्क साधावा, असे आवाहन सोफोशच्या समीक्षा महाबळेश्वरकर यांनी केले आहे.