कांदा अर्धे शतक पार; नवे पीक न आल्याने जुन्या कांद्याने खाल्ला भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 11:54 PM2020-09-22T23:54:44+5:302020-09-22T23:54:55+5:30
लॉकडाऊनमध्ये कांद्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कांद्याचे दर वाढले की गृहिणींचे बजेटच कोलमडते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढत चालले असून मंगळवारी त्याच्या दराने अर्धे शतक पार केले. पावसामुळे नवीन कांदा न आल्याने आणि जुना खराब झाल्याने तो संपत आला आहे. यामुळे वाढत्या मागणीने कांद्याचे दरही वाढले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये कांद्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कांद्याचे दर वाढले की गृहिणींचे बजेटच कोलमडते. कांदा निर्यातीवर सरकारने बंदी आणल्यानंतर कांद्याचे दर कमी होतील अशी अपेक्षा असली तरी मुंबई, ठाण्यामध्ये कांद्याच्या दराची परिस्थिती वेगळी आहे.
१३ आॅगस्टपासून होलसेल आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढू लागले असले तरी सप्टेंबर महिन्यात जास्तच भाव खाल्ला आहे. मंगळवारी ठाण्याच्या बाजारपेठेत कांदा तब्बल ५० ते ६० रुपये प्रतीकिलो या भावाने विकला गेला.
बाजारपेठेत नवीन कांदा आलेला नाही. जून महिन्यात चांगलाच वादळी पाऊस झाला होता. त्याचा विपरीत परिणाम कांद्यावर झाल्याने उपलब्ध असलेला जुना कांदा हा खराब झाला आहे. त्यामुळे तो संपत आल्याने बाजापरेठेत ग्राहकांकडून मागणी जास्त आणि त्या तुलनेत पुरवठा मात्र कमी अशी परिस्थिती कांद्याच्या बाजारपेठेत असल्याने त्याचे दर सद्य:स्थितीत चांगलेच कडाडले आहेत. दीड महिना तरी नवीन पीक येणार नाही़ यामुळे कांदे महागच राहतील, असे कांद्याच्या विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणे बाजारपेठेतील कांद्याच्या दराचा चढता आलेख
तारिख होलसेल किरकोळ
१३ ते २० आॅगस्ट १० ते १२ १५ ते २०
२० ते ३० आॅगस्ट १५ ते १६ २० ते २५
१ ते १० सप्टेंबर २० ते २५ ३० ते ३५
१० ते १९ सप्टेंबर २५ ते ३२ ३५ ते ४०
आजचा भाव (२० सप्टेंबर) ४० ते ४३ ५० ते ६०
जुुना कांदा १० ते १५ टक्केच उपलब्ध आहे. नवीन पीक येईपर्यंत जुनाच कांदा विकायचा आहे. लॉकडाऊनमध्ये बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याची निगा राखली नाही. त्यात वादळी पाऊस झाल्याने तो खराब होत गेला. त्यामुळे नुकसान जास्त झाले आणि त्याचे भाव वाढले.
- संदीप चौधरी,
विक्रेते, ठाणे
आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात कर्नाटकमधून कांदा राज्यात येतो. परंतु, पावसामुळे तो खराब झाल्याने बाजारात येऊ शकत नाही. तसेच, कांदा बी तयार करणाºया कंपन्याही चांगल्या दर्जाचे कांदे मागत आहेत. त्यांना महाग असले तरी चांगले कांदे हवे आहेत. त्यामुळे कंपन्या आणि ग्राहकांकडून मागणी आणि जुन्या कांद्याचा संपत आलेला माल यामुळे भाव वाढलेत.
- शिवप्रसाद गोळवा, व्यापारी, आळेफाटा