कांद्याने केले शतक पार, खरेदी-विक्री घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:52 AM2019-11-25T02:52:44+5:302019-11-25T02:53:25+5:30
अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे.
ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे ८० रुपये किलो दराने विकला जाणाऱ्या कांद्याने आता चक्क शंभरी गाठली आहे. जुना कांदा संपत आल्याने आणि नव्या कांद्याचा दर्जा खालावल्याने कांद्याची आवक प्रचंड घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कांदाविक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.
अवकाळी पावसाने कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओतूर, जुन्नर, नगर या ठिकाणांहून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याची आवक होत असते. जुना कांदा आता संपत आला आहे. जुन्या कांद्याचे प्रमाण पाच ते १० टक्क्यांवरून आता एक ते दोन टक्क्यांवर आले आहे. विक्रेत्यांकडे आता इतकाच जुना कांदा शिल्लक आहे. अशातच अवकाळी पावसाचा फटका नवीन कांद्याला बसल्यामुळे नवीन कांदाही चांगला येत नाही. एकूणच परिस्थितीमुळे कांद्याची आवक ५० टक्के घटली असल्याची माहिती कांदाविक्रेते संदीप चौधरी यांनी दिली.
२२ आॅक्टोबरपासून बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ होत गेली. त्यावेळी कांदा किरकोळ बाजारात ५० रुपये, तर होलसेल बाजारात ४० रुपये किलो, चार ते पाच दिवसांनंतर हाच कांदा १० रुपयांनी वाढून किरकोळ बाजारात ६० रुपये, तर होलसेल बाजारात ५० रुपये किलोवर भाव पोहोचले. ३० आॅक्टोबर रोजी पुन्हा कांद्याचे दर वाढून किरकोळ बाजारात ७० आणि होलसेल बाजारात ६० रुपये किलो दराने कांदा विकला जाऊ लागला.
४ नोव्हेंबरपासून हाच कांदा होलसेल बाजारात ६५ ते ७० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विकला जात होता. काही दिवसांनी कांद्याचे दर पुन्हा कडाडले. ठाण्याच्या होलसेल बाजारात जुना कांदा ८५ ते ९० रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ बाजारात १०० रुपये किलोने तसेच नवीन कांदा होलसेल बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. रविवारी होलसेल बाजारात जुना कांदा ९0 ते १00 रुपये, तर किरकोळ बाजारात हाच कांदा १00 ते ११0 रुपये किलोने विकला गेला. नवीन कांदा होलसेल बाजारपेठेत ७0 ते ८0 रुपये आणि किरकोळ बाजारपेठेते ९0 ते १00 रुपये किलोप्रमाणे विकला. नवीन कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने ५० टक्के चांगला आणि ५० टक्के खराब कांदा येत आहे. कांद्याचे दर कमी व्हायला कमीतकमी एक महिना तरी जाईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
मागणीत मोठी घसरण
हॉटेलवाल्यांना एरव्ही दररोज १० कांद्याच्या गोण्या विकल्या जात होत्या. आता तीन ते चार गोण्याच जात आहेत. ठाणे शहरात एरव्ही १५०० ते १६०० टन कांदा दररोज विकला जातो. परंतु, सध्या १०० टनच विकला जात असल्याचे कांदा विक्रेते संदीप चौधरी यांनी सांगितले.