कांदा शंभरी गाठणार, गृहिणींचे बजेट कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 12:50 AM2019-11-05T00:50:51+5:302019-11-05T00:51:04+5:30
८० रुपये किलो : सामान्यांच्या डोळ्यांत अश्रू
ठाणे : अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकांचे नुकसान झाले असून गेल्या १५ दिवसांपासून ठाण्याच्या बाजारपेठेत येणाऱ्या कांद्याचे दर वाढतच आहेत. कांद्याची आवकच घटल्याने कांद्याचे दर सोमवारी ८० रुपये किलो होते. थोड्याच दिवसांत कांदा शंभरी गाठण्याची शक्यता विक्रेत्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पालेभाज्या, फळभाज्यांप्रमाणे कांदाही महागला आहे. ओतूर, जुन्नर, नगर या ठिकाणांहून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याची आवक होत असते. जुना कांदा आता संपत आला आहे. जवळपास ५ ते १० टक्केच जुना कांदा बाजारात उपलब्ध आहे. अवकाळी पावसाचा फटका नवीन कांद्याला बसल्यामुळे येणारा नवीन कांदा खराब स्थितीमधील असल्याने कांद्याची आवक ५० टक्के घटली असल्याची माहिती कांदाविक्रेते संदीप चौधरी यांनी दिली. २२ आॅक्टोबरपासून ठाण्याच्या बाजारपेठेत कांद्याच्या दरात वाढ होत गेली. त्यावेळी कांदा किरकोळ बाजारात ५० रुपये किलो, तर होलसेल बाजारात ४० रुपये किलो होता. चार ते पाच दिवसांनंतर हाच कांदा १० रुपयांनी महागला आणि किरकोळ बाजारात ६० रुपये किलो तर होलसेल बाजारात ५० रुपये किलोवर पोहोचला. ३० आॅक्टोबर रोजी पुन्हा कांद्याचे दर वाढले आणि किरकोळ बाजारात ७० आणि होलसेल बाजारात ६० रुपये किलो अशा दराने विकला जाऊ लागला. सोमवारी हाच कांदा होलसेल बाजारात ६५ ते ७० रुपये तर किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. जुना कांदा संपत आल्याने आणि नवीन कांद्याचा दर्जा चांगला नसल्याने कांद्याचे दर शंभरीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे चौधरी यांनी सांगितले. पाऊस आता थांबला असला तरी पुढील महिनाभर कांदा महागच असेल, असेही ते म्हणाले. कांदा महागल्यामुळे कांद्याच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. अडीच ते पाच किलो कांदा नेणारे ग्राहक आता एकच किलो कांदा नेत आहेत. कांदा संपल्यावर पुन्हा विकत घेऊ, अशी प्रतिक्रिया त्यांच्यातून उमटत आहे. कांदा महागल्याची नाराजी विक्रेते आणि ग्राहक दोघांमध्ये आहे. हॉटेलमध्येही गरजेपुरता कांदा वापरला जात असून जेवणाबरोबर ग्राहकांना कांदा देताना मर्यादित प्रमाणातच देत असल्याचे हॉटेलमालकांनी सांगितले.
कांदाभजी महागणार
ठाण्यात खाद्यपदार्थांकरिता अनेक जॉइंट्स लोकप्रिय आहेत. अशा अनेक ठिकाणी कांदाभजी एकतर महागणार आहेत किंवा तूर्त काही दिवस कांदाभजी दिसणार नाहीत, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ठाण्यातील मिसळ ही लोकप्रिय आहे. अनेकजण मिसळ खाण्याकरिता ठाण्यात येतात. मिसळची लज्जत वाढवणारा कांदा कमी प्रमाणात देण्यास हॉटेलमालकांनी सुरुवात केली आहे किंवा मिसळसोबतचा कांदा गायब झाला आहे. मांसाहारी जेवणासोबत दिला जाणारा कांदाही बंद करण्यात येणार असल्याचे काही हॉटेलमालकांनी सांगितले.