ठाण्यात १७ हजार रिक्षा चालकांनी भरला अनुदानासाठी आॅनलाइन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 01:16 AM2021-06-08T01:16:32+5:302021-06-08T01:19:03+5:30
ठाण्यात ८४ हजार परवानाधारकांपैकी १७ हजार रिक्षा चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. इतरांना आधारकार्डची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दोन ठिकाणी तात्पुरते विशेष आधार केंद्र सुरु केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांसाठी लॉकडाऊनच्या काळात सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासाठी काही तांत्रिक अडचणींपैकी आधारकार्डचीही एक समस्या आहे. ठाण्यात ८४ हजार परवानाधारकांपैकी १७ हजार रिक्षा चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. इतरांना आधारकार्डची समस्या उद्भवू नये, यासाठी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दोन ठिकाणी तात्पुरते विशेष आधार केंद्र सुरु केले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात परवानाधारक रिक्षा चालकांना शासनाकडून दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य घोषित केले आहे. अर्थात, असे असले तरी तांत्रिक तसेच इतर काही अडचणींमुळे ते मिळविण्यासाठी या रिक्षा चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यात प्रामुख्याने आधारकार्ड वरील नाव अथवा मोबाईल क्र मांक जोडणे ही एक मोठी समस्या आहे. त्यात काही महिला रिक्षा चालकांचे माहेरचे नाव आणि सासरच्या नावात अधिकृत बदल न झाल्यामुळे त्यांनाही काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काहींचे तर बँकेत खातेही नाही. ज्यांना आधारकार्डमुळे अनुदान मिळविण्यात अडचणी येत आहेत, त्यांच्या त्या दूर होण्यासाठी ठाणे आरटीओ कार्यालयात आधार केंद्राला परवानगी मिळावी, अशी मागणी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांच्याकडे रिक्षा चालकांच्या काही संघटनांनी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन जिल्हाधिकऱ्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील उपप्रादेशिक कार्यालयात ही तात्पुरती स्वरूपाची आधारकेंद्र ३ जून पासून कार्यान्वित केली. ठाण्यात जिल्हा कारागृहासमोरील तसेच एलआयसी कार्यालयाजवळ असलेल्या आरटीओ कार्यालयाच्या आवारातही ही आधारकेंद्र रिक्षा चालकांसाठी सुुरु झाली आहेत. आता या केंद्रांवर आधारकार्ड काढून त्याद्वारे अनुदान मिळविण्यासाठी रिक्षा चालकांना सुलभ होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी दिली. ठाणे विभागांतर्गत ८४ हजार रिक्षांची अधिकृत नोंदणी आहे. त्यातील आतापर्यंत १७ हजार चालकांनी अनुदानासाठी आॅनलाईन अर्ज केला आहे. इतरांनीही योग्य कागदपत्रे जोडून या अनुदानासाठी अर्ज करावेत. तसेच ज्यांच्याकडे आधारकार्डची समस्या असेल त्यांनी ठाण्यातील आरटीओ कार्यालयाच्या आवारातील आधारकेंद्रावर ती काढून घ्यावीत, असे आवाहनही आरटीओ कार्यालयाने केले आहे.