एस.टी.चे ऑनलाईन बुकिंग ग्रामीण भागात ठाऊकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:42 AM2021-08-26T04:42:32+5:302021-08-26T04:42:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : प्रवासीभिमुुख होण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि पेपरलेस कसा होईल, यावर भर देण्यासाठी ...

Online booking of ST is not known in rural areas | एस.टी.चे ऑनलाईन बुकिंग ग्रामीण भागात ठाऊकच नाही

एस.टी.चे ऑनलाईन बुकिंग ग्रामीण भागात ठाऊकच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : प्रवासीभिमुुख होण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि पेपरलेस कसा होईल, यावर भर देण्यासाठी राज्यभरात राज्य परिवहन महामंडळाने ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा १० वर्षांपूर्वी सुरू केली. मात्र, तिला शहरी भागातून जास्त प्रतिसाद असून ग्रामीण भागात ते ठाऊकच नाही.

बसने प्रवासी करणारे हे सामान्य प्रवासी आहेत. त्यांना खासगी वाहनाने प्रवास परवडत नाही. त्यांच्याकडून बसप्रवासाला प्राधान्य दिले जाते. सामान्यांच्या हाती आजही साधा मोबाईल आहे. त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही. तसेच त्यांच्या घरी इंटरनेटची सुविधा नाही. त्यांच्याकडून ऑनलाईन तिकीट बुकिंग केले जात नाही. त्यांचे ऑफलाईन तिकीट खरेदीला जास्त प्राधान्य असते. ग्रामीण भागात विजेच्या कमी दाबाची समस्या आहे. तसेच ग्रामीण भागातील मोबाइलला अनेक वेळा रेंज नसते. त्यामुळे त्या ठिकाणच्या प्रवाशांना घरबसल्या ऑनलाईन तिकीट बुकिंगचा लाभ घेण्यात तांत्रिक अडचणी आहेत. तसेच त्यांच्याकडे अत्याधुनिक सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ऑनलाईन तिकीट बुकिंग केली जात नाही. खरे तर त्यांना आजही ऑनलाईन तिकीट बुकिंग ठाऊक नाही.

--------------------------------------------

दहा वर्षांत झालेले ऑनलाईन बुकिंग !

राज्यभरात ऑनलाईन बस तिकीट बुकिंग सुरू आहे. पहिल्यापेक्षा ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा लागतो. ऑनलाईन तिकिटामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्नच येत नाही. कोरोनाकाळात बससेवा सामान्यांकरिता बंद होती. केवळ आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांकरिता ती सुरू होती. गेल्या दहा वर्षांतील ऑनलाईन तिकीट विक्री किती झाली. याचा डाटा डेपोकडे उपलब्ध नाही. तो महामंडळाच्या पोर्टलवरच उपलब्ध होऊ शकतो.

--------------------------------------------

असे करावे ऑनलाईन बुकिंग

राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन दिलेल्या माहितीनुसार प्रवाशाने त्याच्या प्रवासाचा तपशील भरल्यास त्याला ऑनलाईन तिकीट बुक करता येते. त्याची पावती मोबाइलवर येते. वाहकाला प्रवाशाने केवळ मोबाइलवरील बुकिंगची फोटो कॉपी दाखविली तरी त्याचे काम भागते. लांब पल्ल्याच्या गाड्यांना ऑनलाईन बुकिंगचा जास्त प्रतिसाद असतो. विशेषत: कामानिमित्त पुणे, नाशिक, नगरला जाणाऱ्या प्रवाशांकडून ऑनलाईन तिकीट बुक केले जाते. शहरातील वाहतुकीसाठी प्रवासी ऑफलाईन तिकीट खरेदीला जास्त प्रतिसाद देतात.

--------------------------------------------

आम्हाला ठाऊकच नाही !

१. मी कामानिमित्त कल्याण-नगरमार्गे प्रवास करतो. माझ्याकडे स्मार्टफोन नाही. तसेच इंटरनेटला जाऊन तिकीट कसे बुक करावे हे माहीत नाही. त्यामुळे मला ऑनलाईन बुकिंग माहीत नाही.

- देवचंद चावके, कल्याण.

२. मी खासगी कार्यालयात कामाला आहे. मात्र मला ऑनलाईन तिकिटाऐवजी ऑफलाईन तिकीट काढणे चांगले वाटते. त्यामुळे मी कधीही ऑनलाईन तिकिटाच्या फंदात पडलेले नाही.

- सविता चोपडे, कल्याण.

--------------------------------------------

कुठूनही करता येते बुकिंग

राज्य परिवहन महामंडळाकडून गेल्या दहा वर्षांपासून ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा सुरू आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, तसेच ज्यांना इंटरनेटचे ज्ञान आहे, अशा प्रवाशांकडून ऑफलाईनऐवजी ऑनलाईन तिकीट बुकिंग केले जाते. ऑनलाईन बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळतो.

- विजय गायकवाड, डेपो व्यवस्थापक, कल्याण.

--------------------------------------------

Web Title: Online booking of ST is not known in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.